विलास भेगडे
लोकमत न्यूज नेटवर्क, तळेगाव दाभाडे: दैव जात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा! हे गीत आठवायचे कारण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील रवींद्र महाजनी या दिग्गज अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू. आंबी येथील एक्झर्बिया सोसायटीत ते सात आठ महिन्यांपूर्वी राहण्यास आले होते. आयुष्यात इतकी मोठी कमाई करूनही ते अखेरचे दिवस वनरुम किचनमध्ये राहून घालवत होते. स्वतःच हाताने अन्न शिजवायचे आणि खायचे. या काळात त्यांना भेटण्यासाठी मित्रमंडळी किंवा नातेवाईक आल्याचे आठवत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
शनिवारी दुपारी या सोसायटीला भेट दिली असता सोसायटीमधील वातावरण दुःखदायक होते. इतका मोठा अभिनेता या ठिकाणी राहतो याची कल्पनाच नव्हती असे अनेकांनी सांगितले. याबाबत सोसायटीतील सुरक्षारक्षक बाळासाहेब घोजगे म्हणाले, रवींद्र महाजनी एकटेच फिरायला जात होते. ते फारसे कोणाशी बोलत नव्हते. ते स्वतःच गाडी चालवायचे. त्यांच्या एका पायाला काहीतरी जखम झालेली होती. तरी ते स्वतःच गाडी चालवायचे. त्यांच्यासोबत ड्रायव्हरही नव्हता.
याबाबत बोलताना सोसायटीतील सेल्स ॲडमीन मयूरकुमार ओव्हाळ म्हणाले, रवींद्र महाजनी यांना घराचे साहित्य शिफ्ट करताना आम्ही ओळखले होते. त्यांनी हस्तांदोलन केले होते. त्यांचा स्वभाव शांत, प्रेमळ होता. ते सर्वांशी प्रेमाने वागायचे. त्यांच्या घरामध्ये गॅस सिलिंडर होता. क्वचितच ते जेवणाचे पार्सल घेऊन येताना दिसत होते. त्यांना डॉक्टरांनी आल्हाददायक हवेच्या ठिकाणी जागा बदला, असा सल्ला दिला होता. त्यामुळे ते या ठिकाणी राहण्यास आले होते. त्यांच्या फ्लॅटचे बांधकाम मुळशी तालुक्यात सुरू होते. त्यानंतर ते मुळशीला राहायला जाणार होते, असेही त्यांनी सांगितले.
एका एजंटने त्यांना या सोसायटीतील फ्लॅट दाखवला होता. त्यानंतर येथे राहायला ते आले होते. सात-आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी राहत होते. त्यांच्या फोर व्हीलर गाडीला कधी प्रॉब्लेम आला तर त्यांना मी हक्काने तळेगाव येथील बाजारपेठेत घेऊन जात होतो. तेथे भाजीपाला खरेदी करून ते परत येत होते, अशी आठवण सांगताना मयूरकुमार ओव्हाळ यांचे डोळे पाणावले.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले की, इतका मोठा माणूस येथे राहतो, हे आम्हाला माहीतच नव्हते. मृतदेह आढळला आहे, असा कॉल आल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो.