- मेहा शर्मा
बॉलिवूडला एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक म्हणजे, मधुर भांडारकर ( Madhur Bhandarkar). परिस्थितीचे चटके खात मोठे झालेले आणि आपल्या अनुभवातून समाजाला वास्तववादी सिनेमे दाखवणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. कॉर्पोरेट जगतापासून मनोरंजन, राजकारण, पत्रकारिता, अंडरवर्ल्ड यांचा खरा चेहरा दाखवणारा दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे. येत्या 28 सप्टेंबरला त्यांच्या ‘चांदनी बार’ या सिनेमाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी चित्रपट, भविष्यातील त्यांच्या योजनांवर प्रकाश टाकला. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा सारांश...
‘चांदनी बार’साठी कशी प्रेरणा मिळाली?मधुर भांडारकर - ‘त्रिशक्ती’ अपयशी ठरल्यावर मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला स्वत:ला अपील होईल, अशी कथा, असा विषय मला हवा होता. ‘त्रिशक्ती’ हा लोकांच्या नजरेतून मांडलेला सिनेमा होता. आता मला मधुर भांडारकरचा ‘स्टँप’ असेल असा सिनेमा हवा होता. एकदिवस मी बीअर बारमध्ये होतो आणि तिथेच मला हा विषय क्लिक झाला. या लोकांच्या आयुष्याबद्दल आत्तापर्यंत कुणीच बोललं नव्हतं. त्यामुळे मी यावर लक्ष केंद्रीत केलं. त्यासाठी अभ्यास केला, निरीक्षण केलं, संशोधन केलं. बार आणि याच्याशी संबंधित लोकांशी बोललो, त्यांना भेटलो आणि यातून ‘चांदनी बार’ सारखी कलाकृती जन्मास आली. जी लोकांना प्रचंड आवडली.
तुम्ही अनेक इंडस्ट्रीचा खरा चेहरा सिनेमांतून दाखवला. यादरम्यान विरोधाचे सूरही उमटले असतील?मधुर भांडारकर- नक्कीच. मी अनेकदा अशा प्रतिक्रियांचा सामना केला. 'चांदनी बार' या सिनेमानंतर बीअरबार इंडस्ट्री नाराज झाली होती. ‘हिरोईन’ या चित्रपटानंतर माझ्या इंडस्ट्रीचे लोक माझ्यावर नाराज होते. मी आतलं जग का दाखवतो? असा प्रश्न मला विचारला गेला. मला विचाराल तर, सिनेमा हे वास्तव दर्शवणारं एक प्रभावी माध्यम आहे. पुस्तकांतून, ब्लॉगमधून काळ्याकुट्ट जगाच्या इनसाईड स्टोरी लिहिल्या जातात, तेव्हा कोणाला काहीच अडचण नसते. पण यावर चित्रपट बनतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया उमटतात. त्या स्वाभाविकही आहेत. जग जसं आहे, तसंच मी माझ्या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. मीडियातील काही लोक मला ‘सेल्युलाईड जर्नलिस्ट’ (चित्रपटाची कथा उत्तमपणे सांगणारा पत्रकार) म्हणतात. मी एक यशस्वी ‘स्टोरीटेलर’ आहे. दबावतंत्राला बळी न पडता मी आहे तेच दाखवतो, तेच मला आवडतं.
सेन्सॉर बोर्डाला कसं हाताळता?मधुर भांडारकर - नियमांच्या चौकटीत राहून आपल्याला काम करावं लागतं. हो, तुम्ही वाट्टेल तितका वाद घालू शकतात. पण चित्रपटात अनेकांचा पैसा लागलेला असतो. चित्रपट रखडला तर निर्मात्यांना तोटा सहन करावा लागतो. हे परवडणारं नसतं.
सेन्सॉर बोर्डाने तुमच्यावर अन्याय केला, असं कधी वाटलं का?मधुर भांडारकर - ‘दिल तो बच्चा है जी’ हा सिनेमा बनवला, तेव्हा जाणवलं. हा एक कौटुंबिक चित्रपट होता. पण फक्त काही शब्दांमुळे त्याला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं. हा एक मजेदार सिनेमा होता आणि प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडेल असा सिनेमा होता.
पत्रकारांच्या दृष्टिकोनातून साकारलेला ‘पेज 3’ हा सिनेमा बनवण्यामागची प्रेरणा काय होती?मधुर भांडारकर - मी फिल्म इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला जाणवलं की, बॉलिवूडच्या पेज थ्री पार्ट्यांसाठी अगदी भांडणं होतात. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो होतो. काही ‘कनेक्शन’ वापरून मी अशा काही पार्ट्यांमध्ये सामील झालो. अर्थात ‘चांदनी बार’ यशस्वी झाल्यानंतर मला अशा पार्ट्यांची निमंत्रण येणं सुरू झालं. या पार्ट्यांमध्ये मी लोकांचं निरीक्षण करायचो. पार्टीला येताना लोक मुखवटे लावून येतात आणि पार्टी संपली की दुसऱ्या दिवशी तो उतरवून कामावर जातात, हे मला प्रकर्षानं जाणवलं. मला या पार्ट्यांवर चित्रपट बनवायचा होता. पण तो कोणाच्या दृष्टिकोनातून बनवायचा हा प्रश्न होता. एकदिवस मी पार्टीतून घरी परतत असताना तीन पत्रकार टॅक्सी स्टँडकडे जाताना मला दिसले. त्यांना पाहून पत्रकारांच्याच दृष्टिकोनातून हा सिनेमा बनवला तर? असा विचार माझ्या डोक्यात चमकला. एकीकडे ते बड्या-बड्या सेलिब्रिटींना भेटतात आणि दुसरीकडे टॅक्सी शोधतात. हा सामान्य माणसाचा दृष्टिकोन होता. पत्रकार बायलाईनच्या शोधात असतात आणि त्या बायलाईनचा निर्णय घेणारा त्यांचा बॉस असतो. त्यांचा संघर्ष मला अधिक वास्तववादी वाटला आणि मी पत्रकारांना समोर ठेवून ‘पेज थ्री’ बनवला.
तुमच्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगाल?‘इंडिया लॉकडाऊन’ हा माझा नवा प्रोजेक्ट आहे. येत्या 2-3 महिन्यांत हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होईल की चित्रपटगृहांत हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाही. पहिला लॉकडाऊन सर्वांसाठी कसोटीचा होता. या चित्रपटात चार कथा आहेत. चित्रपटांत उत्तम कलाकार आहेत.