Join us

एका कारणामुळे मृण्मयी देशपांडेने 'सारेगमप'च्या सूत्रसंचालनासाठी दिला होकार,जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 3:13 PM

सूत्रसंचालन करताना मी एक अभिनेत्री नाही तर मृण्मयी देशपांडे म्हणून प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे अभिनयाचा आव आपण त्या ठिकाणी नाही आणू शकत आणि मुळातच माझी ऍक्टिंग ही ऍक्टिंग नसते. त्या वेळेस मला जे वाटतं ते मी पडद्यावर साकारते. रिऍलिटी शोमध्ये भावना खऱ्या असतात.

आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिकेतून  मृण्मयी देशपांडेनेने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. अभिनयातून तिने रसिकांची मने जिंकली आहेत. सतत काहीतरी नवीन करण्याच्या शोधात ती असतो. सारेगमप लिटील चँम्पस कार्यक्रमामध्ये ती सुत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकत आहे. याविषयी मृण्यमीने सांगितले की, मी स्वतः ११वी पर्यंत शास्त्रीय संगीत शिकली आहे.

 

माझी आई आणि बहीण गौतमी दोघी उत्तम गातात त्यामुळे घरी संगीताचा वारसा आहे. तसेच सारेगमप या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईच स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. मुळातच गाणं हा विषयच माझ्या खूप जवळचा आहे आणि या पर्वातील स्पर्धक खूपच उत्तम आहेत त्यामुळे मला खूप मजा येतेय.

मला त्यांच्या सोबत काम करताना खूप मजा येतेय. हे पाचही जण खरोखर रत्न आहेत. इतक्या वर्षानंतर त्यांना ज्युरींच्या भूमीकेत बघताना मला खूप छान वाटतंय. त्यांना आपण सर्वांनीच लहानपणापासून बघितलं आहे. अजूनही त्यांना बघून माझ्यासमोर ती लहान पिल्लं समोर येतात; पण खरंच त्यांनी त्यांच्या करियरमध्ये खूप यश मिळवलं आहे. म्हणूनच त्यांना आपण पंचरत्न म्हणून ओळखतो. मुळातच अभिनयासाठी स्क्रिप्ट असते. अँकरिंगसाठी स्क्रिप्ट नसते. तुम्हाला त्यामध्ये खरं खरं बोलावं लागत. गाणं सादर झाल्यावर त्या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही त्या वेळेस डोक्यात तयार करायचं असतं. त्यामुळे इकडे स्क्रिप्टचं एवढं महत्व नसतं.

जर तुम्ही खरे असाल तर त्यामध्ये तुम्हाला अभिनय करण्याची गरज नसते. अँकर हा माणूस म्हणून कसा आहे हे लोकांपर्यंत अँकरिंग करताना पोहोचतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना मी एक अभिनेत्री नाही तर मृण्मयी म्हणून प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे अभिनयाचा आव आपण त्या ठिकाणी नाही आणू शकत आणि मुळातच माझी ऍक्टिंग ही ऍक्टिंग नसते. त्या वेळेस मला जे वाटतं ते मी पडद्यावर साकारते. रिऍलिटी शोमध्ये भावना खऱ्या असतात.

 

गाणं कानावर पडल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया खऱ्या असतात. त्यामुळे यामध्ये अभिनयाला शून्य वाव आहे. प्रत्येक सूत्रसंचालकाने उत्स्फूर्त असणं अतिशय महत्वाचं आहे. मुळातच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, कधी एखाद्याच गाणं वाईट होऊ शकतं त्यावेळी त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्या समोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडे