अलका याज्ञिक यांनी त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. त्यांनी पायल की झंकार या चित्रपटापासून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्या केवळ १४ वर्षांच्या होत्या. त्यांनंतर त्यांनी मेरे अंगने में हे गाणे गायले. या गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतले असले तरी या गाण्यानंतर त्यांना म्हणावे तसे चांगले काम मिळत नव्हते. त्यांचा स्ट्रगल हा सुरूच होते. पण तेजाब चित्रपटातील एक दो तीन या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत.
अलका याज्ञिक यांनी नव्वदीचे दशक गाजवले असले तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात गात नाहीयेत. अलका यांनी चित्रपटात न गाण्यामागे एक खास कारण आहे. संगीतात गेल्या काही वर्षांत आलेल्या बदलांमुळे अलका यांनी चित्रपटात गायचे नाही असे ठरवले आहे. केवळ अलकाच नाही तर उदित नारायण, कुमार सानू यांसारखे प्रसिद्ध गायक देखील सध्या चित्रपटात खूपच कमी गातात.
अलका याज्ञिक यांचे नीरज कपूर यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. पण त्यांच्यात काहीही भांडणं नसली तरी त्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहातात. अलका यांनी १९८९ साली नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. कुठल्या मतभेदामुळे वा वादामुळे नाही तर एका वेगळ्या कारणासाठी.
नीरज आणि अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमन. लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँगला जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा 'सिलसिला' चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगला परत जाऊन आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा 'लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप' दोघांच्याही वाट्याला आले. तेव्हापासून नीरज आणि अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.