अनुष्का शर्माचा आज म्हणजेच 1 मे ला वाढदिवस असून तिने रब दे बना दी जोडी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने बँड बाजा बरात, जब तक है जान, पीके, सुलतान, संजू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तिचे वडील आर्मीत होते तर आई अशिमा ही गृहिणी. अनुष्काचे शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झाले आहे. तिला मॉडलिंग अथवा पत्रकारितेत करियर करण्यात रस होता. त्यामुळे मॉडलिंग करण्यासाठी ती मुंबईत आली आणि तिने लॅक्मे फॅशन वीकपासून तिच्या मॉडलिंग करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने काही जाहिराती केल्या. त्याचदरम्यान तिने अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.
अनुष्का शर्माने हिंदी चित्रपटसृष्टीत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एकदाही मागे वळून पाहिले नाही. डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. याच सीक्रेट वेडिंगबद्दल ‘वोग’ या जगप्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते की, आम्हाला एक कौटुंबिक विवाह सोहळा हवा होता. आमच्या लग्नात केवळ ४२ पाहुणे होते. केवळ आमचे कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र. मला सेलिब्रिटी वेडिंग नको हवे होते. त्यामुळेच आम्ही सीक्रेट वेडिंगचा बेत आखला. हे वेडिंग इतके सीक्रेट होते की, केटररला आम्ही आमची खोटी नावे सांगितली होती. मला आठवते, विराटने त्याचे नाव राहुल सांगितले होते.
अनुष्का आणि विराटने आपले प्रेमही अनेक वर्षं जगापासून लपवून ठेवले होते. सुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते. पण या रिलेशनशिपची कुणाला कल्पना देखील नव्हती. त्यामुळेच दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरू झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरू झाली. पुढे याच मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले.