छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरू' मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते.
असाच काहीसे यशोमन आपटेच्या बाबतीतही घडतंय. मानस आणि वैदेहीची प्रेमकहाणी असलेल्या 'फुलपाखरू' या लोकप्रिय मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे मानस आणि वैदेहीचं कॉलेज जीवनातील प्रेम, पुढे त्यांचं झालेलं लग्न आणि त्यांची मुलगी माही, अशा सगळ्यांवरच प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. या प्रेमाच्या जोरावरच आज 'फुलपाखरू' या मालिकेचे ६०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमने, सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशन केले होते.
मानस-वैदेहीचं प्रेम प्रेक्षकवर्गाला नेहमीच आकर्षित करतं. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता यशोमान आपटे गेले काही दिवस जोरात काम करतोय. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी महिन्यातले २५-२६ दिवस तो सेटवरच असतो. गेल्या अडीच वर्षात त्यानं फारशी कधी सुट्टीही घेतलेली नाही.
काम करायला छान वाटतं असं यशोमनने आवर्जून सांगितलं आहे. सेटवर एक कुटुंब मिळाल्याची भावना यशोमनने व्यक्त केली आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे लवकरच ही मालिका सातशे भागांचा टप्पा गाठणार आहे. या निमित्तानं मालिकेतलं एकविसावं गाणंसुद्धा यशोमानवर चित्रीत होणार आहे.