Join us

एका बाजूला रीना दत्ता, दुसरीकडे किरण राव; लेकीच्या लग्नात दोन्ही एक्स पत्नींची आमिर खानने घेतली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:44 IST

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात व्यस्त आहे. आयराच्या लग्नासाठी आमिर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह उदयपूरमध्ये आहे, जिथे आयराचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याची मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांच्या लग्नात व्यस्त आहे. आयराच्या लग्नासाठी आमिर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह उदयपूरमध्ये आहे, जिथे आयराचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. अलीकडेच आयराच्या रजिस्टर लग्नाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे आयरा आणि नुपूर यांना ट्रोलही करण्यात आले होते. आता उदयपूरमधील आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये आमिर खान कुटुंबासोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर खानसह त्याचा मोठा मुलगा जुनैद खान, पहिली एक्स पत्नी रीना दत्ता आणि दुसरी एक्स पत्नी किरण राव हे सर्वजण एकत्र दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे आमिर त्याचा मुलगा जुनैदला डान्ससाठी प्रोत्साहित करताना दिसत आहे आणि नंतर तो स्वतः त्याच्या दोन्ही एक्स पत्नींसोबत डान्स करत आहे. यादरम्यान त्याने जुनैदला डान्ससाठी बोलावताच तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

आमिर खान आणि कुटुंबाचा हा व्हिडिओ लोकगायिक आशु शर्माने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एक गाणे गात आहे आणि आमिर खान त्याच्या दोन्ही माजी पत्नींसोबत डान्स करताना दिसत आहे. यासोबतच मिस्टर परफेक्शनिस्ट देखील सर्वांना शुभेच्छा देताना दिसत आहे. आमिर आणि किरणचा मुलगा आझादही त्याच्या आई-वडिलांसोबत बहिणीच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे.

याआधी आयरा खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिचा भावी पती नुपूर शिखरेसोबत दिसत होती. पण, थक्क करणारी बाब म्हणजे तिचे लग्न असतानाही आयरा अजूनही तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना आयराने कॅप्शनमध्ये लिहिले होते- 'आम्ही खूप वर्कआउट केल्याशिवाय लग्न करू शकतो का?'

मुंबईत होणार रिसेप्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या विधी ७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यानंतर आमिर १३ जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीचे ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आमिर खानइरा खानकिरण राव