रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांचा आज म्हणजेच 7 जानेवारीला वाढदिवस असून त्यांचा जन्म हा मुंबईतील आहे. रिना रॉय यांचे खरे नाव सायरा अली असून त्यांचे वडील सादिक अली यांनी चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या तर त्यांची आई शारदा राय यांनी बावरे नैन या चित्रपटात काम केले होते. पण त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यांच्या आईने सगळ्या मुलांचा सांभाळ केला. त्याचकाळात त्यांनी त्यांचे नाव बदलून रूपा असे ठेवले.
रिना घर चालवण्यासाठी त्यावेळी क्लबमध्ये डान्स करायच्या. एवढेच नव्हे तर पैसे मिळण्यासाठी त्यांनी काही चित्रपटात सेमी न्यूड सीन देखील दिले आहेत. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांचे नाव बदलून रिना असे ठेवण्यात आले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या इंटिमेट सीनची अधिक चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांनी अनेक सेमी न्यूड सीनदेखील दिले होते. त्यामुळे या चित्रपटानंतर त्यांना जरुरत गर्ल अशीच ओळख मिळाली.
रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्या आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. त्या दोघांचे अफेअर जवळजवळ सात वर्षं होते. पण शत्रुघ्न यांनी रिना यांच्याशी लग्न न करता पूनम मीरचंदानीसोबत लग्न केले. त्या वेळेस एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रिना यांनी सांगितले होते की, लग्नानंतर माझी रिनासाठी फिलिंग बदलली असे अनेकांचे म्हणणे आहे. पण हे चुकीचे आहे. उलट तिच्यासाठी असलेली फिलिंग वाढली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, रिनाने तिच्या आयुष्यातील सात वर्षे मला दिली.
शत्रुघ्न आणि रिना यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर रिना यांनी पाकिस्तानी क्रिकेटवर मोहसिन खानसोबत लग्न केले. बॉलिवूड सोडून त्या मोहसिनसोबत पाकिस्तानला निघून गेल्या होत्या. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना मुलगी सनमची देखील कस्टडी मिळाली नाही. यानंतर रिना यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही.