आजकालच्या धावपळीच्या युगात माणसे आपली नातीगोती कुठेतरी मागे टाकत असल्याचे दिसते. पण, या नात्यांना सांभाळून कसे ठेवायचे, त्यांना कसे जपायचे, हे नेहमीच मालिकेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ ही वाहिनीदेखील ‘दुहेरी’ नावाच्या मालिकेच्या माध्यमातून समाजापुढे ठेवत आहे. या मालिकेतून एक बहीण आपल्या बहिणीवर आलेल्या संकटावर मात करीत स्वत:ची ओळख विसरून कसे दुहेरी आयुष्य जगते, याविषयी अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरने ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधला.या मालिकेतील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगणार?- या मालिकेत मी मैथिली झुंजारची भूमिका साकारली आहे. यामध्ये तिच्यावर आई-वडिलांच्या मायेचे छत नसते. फक्त एक बहीण असते. ही बहीणच तिचे आयुष्य असते. बहिणीवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिच्या प्रेमापोटी मैथिली आपली ओळख बदलून एक वेगळेच आयुष्य म्हणजेच दुहेरी आयुष्य जगायला सुरुवात करते. या जबरदस्त भूमिकेसाठी तुला काही विशेष तयारी करावी लागली का?- मी आजपर्यंत असा रोल कधीच केला नाही. मैथिलीची खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. प्रत्येक सीन हा एक्सायटिंग व थ्रिलिंग आहे. तसेच, या मालिकेत असे काही क्षण आहेत, जे मी रिअल लाइफमध्येदेखील फेस केले नाहीत. ते प्रसंग समजून घेऊन करणे खूप अवघड आहे.तू हिंदी मालिकेत काम करतेस, तर हिंदी आणि मराठी मालिकांत काही फरक जाणवला?- फारसा फरक जाणवला नाही; पण हिंदी मालिकेचा फार मोठा रीच आहे. आम्हाला तर हिंदीत मालिकेसाठी परेदशातदेखील प्रेक्षक वर्ग आहे. तसेच त्याचे बजेटदेखील मोेठे असते. बिग बजेटने ऐश्वर्य दाखविता येणे सोपे आहे; पण त्याला खरं डोकं लावून वेळेच्या मर्यादेत व बजेटमध्ये इतक्या कमाल लेवलचा कन्टेन्ट मराठीत दाखविता येतो. कारण, कन्टेन्टनुसार आपण हिंदी मालिकेच्या तुलनेत खूप रीच आहोत, असे नेहमीच जाणवते. मराठी इंडस्ट्रीचे तगडे दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत काम करताना कसे वाटले?- मलापण संजय सरांसोबत काम करायचं होतं. त्या गर्ल्स लिस्टमध्ये माझंही नाव असावं, असं मला नेहमी वाटायचं. सिनेमा, मालिका, जाहिरात यांपैकी कोणत्याही क्षेत्रात त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. दुसरं कारण म्हणजे इतक ग्लॅमर, यश, प्रतिष्ठा, मोठं नाव, मोठं पद असलेली व्यक्तीही तेवढेच मोठे प्रेशर देऊन काम करून घेत असेल; पण इथे वेगळाच अनुभव आला. ते कलाकारांना इतके सांभाळतात की एक प्रोटेक्टिव्ह फादर असल्यासारखेच वाटते.या क्षेत्रातील ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी काही काळापुरतीच असते; मग या सर्व गोष्टींकडे तू कशी पाहतेस?- खरंतर अॅक्टरला अॅक्टिंग सोडूनही वेगळा छंद असला पाहिजे, हे नसिरुद्दिन शहांचं वाक्य मला खूप भावतं या गोष्टींकडे पाहताना. तसेच नवीन कलाकारांशी चित्रपटाव्यतिरिक्त वेगळं काही बोलायला गेलं, तर त्यांना काहीच बोलता येत नाही. दुर्दैवानं काहीच वाचलं जात नाही. जगलं जात नाही. त्यामुळे स्वत:ला जपायचे असेल तर ग्लॅमरचा विचार करतानाच कलाकाराला दुहेरी आयुष्यदेखील जगता आले पाहिजे; आणि ती गोष्ट सुदैवाने आहे माझ्याजवळ. खऱ्या आयुष्यात असा काही अनुभव, की तुला मैथिलीसारखं दुहेरी आयुष्य धारण करावं लागलं?- शिव्या देऊन भांडण करणे इतके गट्स माझ्यात नाहीत; पण असं म्हणतात की, आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो त्यांच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह असतो. असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता. पुण्यातच माझे वडील गाडी चालवत असताना अचानक गाडी बंद पडली आणि एक गाडीवाला येऊन धडकला. काहीही चूक नसताना तो शिवीगाळ करू लागला; पण मीच काच खाली घेऊन त्याची कॉलर पकडली. माझाच विश्वास बसला नाही, की इतकं बळ अचानक कुठून आलं? पण, जेव्हा आपल्या नात्यांवर अशी वेळ येते ना, त्या वेळी पॉसिबल नसतानाही आपण दुहेरी आयुष्य जगत असतो.
- benzeerjamadar@lokmat.com