- जानव्ही सामंत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या एका चित्रपटात प्रेमातील बंध आणि नात्यातील जिव्हाळा उलगडण्यात येणार आहे. वास्तविक अशा आशयावर आधारित आतापर्यंत बऱ्याचशा चित्रपटांची निर्मिती झाली आहे; परंतु अशातही हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा ठरणार, असा विश्वास चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला वाटतो. वास्तविक श्रद्धाने रोमॅण्टिक भूमिका साकरून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटातदेखील श्रद्धा पुन्हा एकदा अशाच काहीशा भूमिकेत आहे. या चित्रपटानिमित्त ‘सीएनएक्स’च्या संपादक जान्हवी सामंत यांनी तिच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : तुझी आनंदाची परिभाषा काय?- खरं तर, मला माझ्या आयुष्यात आनंद मिळविण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी पुरेशा आहेत. कारण माझ्या मते, आयुष्यात सर्वच गोष्टी या बदलणाऱ्या आहेत. आजचे यश उद्या अपयशात बदलू शकते किंवा त्याच्या उलटही घडू शकते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदालाच मी महत्त्व देत असते. हीच माझ्या आयुष्यातील आनंदाची परिभाषा आहे. प्रश्न : स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तू कसा प्रयत्न केला?- मला माहीत आहे की, माझ्या पहिल्या दोन चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर तांत्रिकदृष्ट्या खूप काही यश मिळविले नाही. पण मी प्रत्येक चित्रपटातून नवीन काही शिकण्यासाठी स्वत:ला तयार ठेवले आहे. मला माहिती आहे की, माझ्या प्रत्येक अगोदरच्या भूमिकेपेक्षा पुढची भूमिका सरस असणार आहे. मी पुढच्या प्रत्येक चित्रपटात काम करताना आनंद घेत आहे. कारण मी परिणामांपेक्षा अनुभवावर अधिक लक्ष देत आहे.प्रश्न : गेल्या दोन वर्षांतील तुझ्या चित्रपटांच्या निवडी बघितल्या तर तुला भविष्यात कशा प्रकारचे चित्रपट करावेसे वाटतील? - खरं तर मी याबाबत कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. कारण मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे नियोजन स्वत:च करीत असते. याचा अर्थ मी प्रवाहासोबत वाहून जाण्याच्या मनाची आहे, असा होत नाही. मला करिअरच्या प्रवाहात नवनवीन गोष्टी शिकाव्याशा वाटतात; एव्हाना मी त्या शिकत आहे. पुढच्या काळातही माझ्या करिअरबाबत असेच काहीसे सुरू राहणार आहे. प्रश्न : या चित्रपटाची कथा मॉडर्न जगतातील रिलेशनशिपवर आधारित आहे, त्याविषयी काय सांगशील?- तुम्हाला जर तुमच्या मनातील एखादी गोष्ट कोणाला सांगायची असेल, त्याच्याकडे तुमचे मन मोकळे करायचे असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीशी अगदी जवळची मैत्री करावी लागणार आहे; मात्र याविपरीत तुम्ही समोरच्या व्यक्तीचे मित्र नसाल तर त्याच्याकडे तुमच्या मनातील भावना सांगू शकणार नाही. यासाठी कुठेतरी तुमची मने जुळायला हवीत. याच मध्यवर्ती कल्पनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. माझ्या मते, हा चित्रपट हल्लीच्या रिलेशनशिपविषयी साधर्म्य साधणारा असल्याने नात्याचे बंध उलगडणारा ठरेल. प्रश्न : ग्लॅमरच्या जगतात स्वत:चे स्थान पक्के करण्यासाठी किंवा ठरावीक भूमिकांची प्रतिमा तयार होऊ नये यासाठी तू काही नियोजन केले आहे काय? - नाही, मी अशा प्रकारचे कुठलेही नियोजन केले नाही. कारण माझं संपूर्ण लक्ष चांगले काम करण्याकडेच असते. करिअरच्या प्रारंभीच्या काळात माझ्याकडे दिग्दर्शकांची एक यादी होती. मला याच दिग्दर्शकांसोबत काम करायचे असे मी ठरविले होते. पण, आता मी ती यादी बाजूला ठेवली आहे. कारण मी स्वत:ला मर्यादित का ठेवू? माझ्या भूमिकांमध्ये वैविध्य राहावं म्हणून मला कुठलीही चांगली पटकथा आणि चांगली भूमिका करायला आवडेल. त्याकरिता मी स्वत:ला तयार ठेवले आहे. प्रश्न : कमिटमेंट करणे न करणे याविषयी चित्रपटात काही आहे काय? किंवा अशा गोष्टीला तू या चित्रपटाशी कसे संबंधित ठेवते?- या चित्रपटात असे एक मध्यमवर्गीय मुलगा आहे. तर मुलगी श्रीमंत आहे. ती सर्व सुखसोयींमध्ये आपले आयुष्य व्यतीत करीत असते. अलिशान गाडीमधून तिचा वावर असतो. पण ती तिच्या आयुष्यात पूर्णत: घडलेली आहे, असा याचा अर्थ होत नाही. त्यामुळे तिला काही ठिकाणी मर्यादित वागावे लागले. शिवाय तो तिच्यावर जिवापाड प्रेम करीत असतो, असेही तिला वाटत नाही. त्यामुळे ती त्याला मैत्रीच्या नात्यापर्यंतच मर्यादित ठेवत असते. असं आपल्या बऱ्याचशा प्रकरणात बघायवास मिळत असते. त्यामुळेच कमिटमेंट करणे न करणे किंवा ते पाळणे न पाळणे हे प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे असते. प्रश्न : तुझा पुढचा चित्रपट कुठला? त्याचा अनुभव कसा सांगशील?- माझा पुढचा चित्रपट ‘हसीना’ असणार आहे. आतापर्यंत मला प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका मिळाली आहे. पण या चित्रपटातील भूमिका त्यापेक्षाही वेगळी आहे. कारण या चित्रपटात मी खलनायिका साकारत आहे. १७ व्या वर्षांपासून ते ४५ वर्षांपर्यंतच्या एकाच पात्राची मी यात भूमिका करीत आहे. शिवाय आई म्हणूनही मी या चित्रपटात भूमिका साकारत असल्याने हा अनुभव माझ्यासाठी विलक्षणीय आहे. .
नात्यात ऋणानुबंध असावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 11:49 PM