रीलिज डेट डायरी सुरू करायला हवी!

By Admin | Published: January 3, 2016 04:37 AM2016-01-03T04:37:11+5:302016-01-03T04:37:11+5:30

तिने शिक्षण घेतले पत्रकारितेचे, लहानपणापासून आवड नृत्याची, पण अभिनयक्षेत्रात यायचे म्हटल्यावर घरात कायम हिंदी बोलणाऱ्या या मुलीने मराठीलाही आपलेसे केले

Release Date Diary Should Start! | रीलिज डेट डायरी सुरू करायला हवी!

रीलिज डेट डायरी सुरू करायला हवी!

googlenewsNext

तिने शिक्षण घेतले पत्रकारितेचे, लहानपणापासून आवड नृत्याची, पण अभिनयक्षेत्रात यायचे म्हटल्यावर घरात कायम हिंदी बोलणाऱ्या या मुलीने मराठीलाही आपलेसे केले आणि सर्व तयारीनिशी या क्षेत्रात उतरली. सुरुवातीला शॉर्ट फिल्म्समध्ये काम करता-करता ती हळूहळू चित्रपटांतही दिसू लागली.
अभिनयाला सुरुवात केल्यानंतर ती गौरी, गाढवाचं लग्नं, बकुळा नामदेव घोटाळे, आबा जिंदाबाद, हाय काय नाय काय या चित्रपटांत दिसली खरी, पण तिच्या अभिनयाबरोबरच नृत्याचीही प्रेक्षकांना पारख झाली, ती नटरंग चित्रपटातून.... आणि या चित्रपटानंतर ती चक्क ‘अप्सरा’ या नावानेच ओळखली जाऊ लागली. आता अप्सरा म्हटल्यावर तर तुम्हालाही तिचे नाव सोनाली कुलकर्णी हे उमगले असेलच. तर या अप्सरेला खरा ब्रेक मिळाला तो नटरंगमधूनच. त्यानंतर तिची ‘क्षणभर विश्रांती’ घेत, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, मितवा, क्लासमेट्स, टाइमपास 2 मध्ये गेस्ट अपिअरन्स, शटर अशी यशस्वी घोडदौड सुरू आहे.
या प्रवासात ती आपल्याला ग्रँड मस्ती आणि सिंघम रिटर्न्स या हिंदी चित्रपटातही पहायला मिळाली. नटरंगनंतर अजिंठा, रमा माधव, क्लासमेटस आणि शटर या चित्रपटातून एक वेगळ्याच प्रकारची सोनाली प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. नृत्यांगना असली, तरी अभिनेत्री म्हणूनही तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनालीच्या या हिंदी-मराठी प्रवासात आलेले अनुभव तिने ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केले.

शहरांबाहेरही चित्रपट जायला हवा
आज खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर अशी मुख्य शहरे सोडली, तर इतरत्र पोहोचलेला नाही, हे सत्य आहे. तो पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विदर्भ, कोकण या ठिकाणीही प्रेक्षकवर्ग आहे, पण चित्रपट त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. बरीच लोक यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला असं अगदीच वाटतं की, पुढच्या काही वर्षांमध्ये हा प्रश्न नक्कीच मिटलेला असेल.

वर्षभर आधीच तारखा जाहीर कराव्यात
मराठी चित्रपट हा सर्व गुण-कौशल्यांनी भरलेला आहे, पण तरीही काही सुधारणा होणे आवश्यक आहे. कारण सध्या एकाच वेळेला अनेक चित्रपट येत आहेत. त्यामुळे त्या सर्वच चित्रपटांना त्याचा फटका बसत आहे. काहींना चित्रपटगृह मिळवण्याठीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बॉलीवूडमध्ये दुसऱ्याचा चित्रपट येणार असेल, तर एक निर्माता किंवा कलाकार आपल्या चित्रपटाची रीलिज डेट पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, पण तसे मराठीत खूप कमी प्रमाणात घडते. वर्षभर आधीच चित्रपटाची तारीख जाहीर केली, तर हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्याबरोबरच चित्रपटांची रीलिज डेट डायरी सुरू केली, तर सर्वांनाच हे समजू शकतं की, कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे.

मराठी इंडस्ट्रीने बॉलीवूड असो किंवा
दुसऱ्या कोणत्याही इंडस्ट्रीने काही शिकायला पाहिजे, असं मला वाटत नाही. कारण मराठी इंडस्ट्री ज्या इकॉनॉमिक्समध्ये काम करते, ते मुळातच खूप उत्तम आहे. गेल्या वर्षभरात जवळपास २०१ चित्रपटांपैकी १०० चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे २ कोटींचा एक चित्रपट म्हटला, तरी १०-१२ नव्हे, तर २०० कोटींचा टर्नओव्हर पाहता, आपलं काम हे चांगल्या दर्जाचंच आहे. कमीत कमी वेळात संपूर्ण चित्रपट शूट करणे व तितक्याच चांगल्या दर्जाचा चित्रपट करणे, हे मराठी चित्रपटांच यश आहे. यामुळे प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून चित्रपटगृहांत जाऊ लागला आहे.

मराठी चित्रपट झालाय प्रगल्भ
मराठी इंडस्ट्रीत सुरुवातीपासूनच वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, हे निश्चित मान्य केलं पाहिजे की, आता हे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि प्रेक्षकांकडून ते नोटीसही होत आहेत. वेगळ्या पद्धतीच्या मांडणीवर भर पूर्वीपासूनच होत आहे, पण आता मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचत आहेत आणि त्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे मराठी चित्रपट प्रगल्भ झाला आहे, असं म्हणायला पाहिजे. या शिवाय चित्रपटांबरोबरीनेच कलाकारही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज अनेक प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत.

शब्दांकन - मृण्मयी मराठे

Web Title: Release Date Diary Should Start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.