बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी झाली. सध्या या प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा मिळाला असून तिच्या अंतरिम जामिनाला १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी अभिनेत्री जॅकलिन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात उपस्थित होती.
२६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने जॅकलिनला ५० हजार रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवले होते. आज वकिलांच्या टीमसोबत ती पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली.
Railway Platform Ticket: प्लॅटफॉर्म तिकीट महागले! आता मोजावे लागणार 'इतके' पैसे
आरोपपत्रात नाव आल्यानंतर जॅकलिनला चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी तिची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली होती. जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरनची सर्व माहिती होती असा आरोप आहे. जॅकलिनने सुकेशकडून सुमारे ७ कोटींच्या महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. यामध्ये चैनीच्या वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणात तिच्याशिवाय नोरा फतेहीचेही नाव समोर आले आहे. ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात या दोन्ही अभिनेत्रींची साक्षीदार म्हणून नावे होती. जॅकलिनला नंतर या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले.