दिव्या भारती (divya bharti) हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात कोरलं गेलं आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने जगाचा निरोप घेतला. परंतु, या कमी जीवनप्रवासातही तिने बॉलिवूडमध्ये तिचं नाव अजरामर केलं. आपल्या सौंदर्यामुळे अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या दिव्या भारतीच्या निधनाविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. तिच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवादेखील पसरल्या. परंतु, तिचं निधन नेमकं कसं झालं याचं कोडं अद्यापही उलगडलेलं नाही. परंतु, दिव्याच्या निधनाच्या दिवशी नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम 'इंडिया टुडे'च्या वृत्तात नमूद करण्यात आला आहे.
काहींच्या मते, दिव्याचा मृत्यू हा घातपात होता. तर काहींच्या मते, तो अपघात होता. परंतु, पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या भारतीचा मृत्यू होणं हा एक अपघात होता. ५ एप्रिल १९९३ मध्ये मुंबईतील वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून दिव्याचा मृत्यू झाला. रात्री ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली होती. दिव्याचा अपघात झाल्यानंतर तिला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान तिचं निधन झाला.
शाळा सोडून मॉडलिंगमध्ये केलं होतं पदार्पण
दिव्या भारतीने केवळ ९ वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. वयाच्या १४ व्या वर्षी शाळा सोडणाऱ्या दिव्याने मॉडलिंग क्षेत्रात करिअर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बूबली राजा या तेलुगू चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिने विश्वात्मा या चित्रपटातून बॉलिवूडला आपल्या अभिनयाची झलक दाखवली. विशेष म्हणजे या दोन चित्रपटानंतर तिच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या.
साजिद नाडीयादवालासोबत केलं होतं लग्न?
शोला और शबनमच्या सेटवर दिव्या आणि साजिद नाडीयादवाला यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी दिव्या १८ वर्षांची होती. परंतु, दिव्या आणि साजिद यांच्या प्रेमाला तिच्या वडिलांचा ओम प्रकाश यांचा विरोध होता. वडिलांचा विरोध झुगारुन दिव्याने साजिद यांच्याशी लग्न केलं आणि ते वर्सोवामध्ये तुलसी अपार्टमेंटमध्ये राहायला लागले.
नेमका कसा झाला दिव्याचा मृत्यू?
4 एप्रिल रोजी दिव्या चेन्नईवरुन एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवून मुंबईत आली होती. दुसऱ्या दिवशी तिला हैदराबादला जायचं होतं. परंतु. याच काळात एका ब्रोकरने त्यांना एक नवीन फ्लॅटविषयी सांगितलं. परंतु, तिला पुढील चित्रीकरणासाठी हैदराबादला जायचं होतं. मात्र, कित्येक वर्षांपासून दिव्याला स्वत: च्या नावावर घर घ्यायचं होतं. त्यामुळे पायाला लागल्यामुळे ५ एप्रिलला हैदराबादला येणं शक्य नसल्याचं दिव्याने निर्मात्यांना सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी दिव्या आणि तिचा भाऊ कुणाल ब्रोकरसह वांद्र्यातील नेपच्यून अपार्टमेंटमध्ये घर पाहायला गेले. ४ बेडरुम असलेल्या प्रशस्त फ्लॅटची डिल यावेळी दिव्याने केली होती. त्याच दिवशी रात्री फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचा पती दिव्याला भेटायला आले होते. त्यांना आंदोलन या आगामी चित्रपटासाठी दिव्याचा ड्रेस फायनल करायचा होता.
यावेळी घरात फक्त दिव्या आणि तिची कामवाली अमृता दोघीच होत्या. नीता, तिचा पती आणि दिव्या एकमेकांशी गप्पा मारत असताना दिव्या लिविंग रुमच्या खिडकीवर बसली होती.विशेष म्हणजे या खिडकीला कोणत्याही प्रकारचं सेफ्टी ग्रील नसतानाही दिव्या बाहेरच्या बाजूला पाय सोडून बसली होती. परंतु, दिव्या कायमच असं बसायची असं म्हटलं जातं. खिडकीवर बसलेली असताना दिव्या मित्रांसोबत गप्पाही मारत होती. याच वेळी तिने घरात लिव्हिंग रुममध्ये पाहिलं आणि खिडकीला मजबूतीने पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हात निसटला आणि ती पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळली.
दरम्यान, दिव्या भारतीच्या मृत्यूविषयी अनेक वेगवेगळ्या स्टोरीज सांगण्यात येता. परंतु, दिव्याच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. दिव्याने केवळ १४ चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, तिचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला.