Join us  

'ऑस्कर्स'मध्ये स्मरण पण बॉलिवूडलाच पडला ओम पुरींचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 10:47 AM

ऑस्कर २०१७च्या सोहळ्यात ओम पुरींना श्रद्धांजली वाहण्यात आली पण बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्याबद्दल कोणी अवाक्षरही काढले नाही, अशी टीका नवाजुद्दीनने केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - बहुचर्चित 'ऑस्कर २०१७'चा पुरस्कार सोहळा काल पार पडला, हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमधील कलाकारांनीही या सोहळ्याची खूप उत्सुकता असते. त्यातच देसी गर्ल प्रियाका चोप्रा आणि दीपीका पडूकोण या बॉलिवूड स्टार्सही ऑस्कर्सच्या रेड कार्पेटवर जलवे दाखवत असल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्षही तिथेच लागले होते. याच सोहळ्यातील आणखी एक मानाची बाब म्हणजे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनाही कालच्या सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करण्यात आले त्यामध्ये ओम पुरी यांच्या नावाचाही समावेश होता. पण हॉलिवूडमध्ये त्यांचा एवढा सन्मान होत असताना बॉलिवूडमध्ये/ हिंदी चित्रपटसृष्टीत ओम पुरींच्या योगदानाबद्दल कोणीच बोलले नाही, ही शरमेची बाब आहे, अशी टीका नावजलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने  केली. 
' ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यात ओम पुरींच्या (चित्रपटसृष्टीतील) योगदानानाबद्दल कोणी अवाक्षरही काढले नाही. ही शरमेची बाब आहे' असे ट्विट करत नवाजुद्दीनने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले. 
६ जानेवारी २०१७ रोजी कालवश झालेल्या ओम पुरी यांनी ईस्ट इज ईस्ट, गांधी, सिटी ऑफ जॉय , माय सल दी फॅनेटिक, दी पॅरोल ऑफिसर, वूल सारख्या आंतराष्ट्रीय चित्रपटात काम केले. त्यांच्या  याच योगदानाला सलाम करत ऑस्कर सोहळ्यात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांच्यासोबत ओम पुरींचेही स्मरण करण्यात आले. यामुळे बॉलिवूडमधील कलाकारहीही भारावले आणि त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल कौतुकास्पद उद्गारही काढले. मात्र येथील पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांचा सर्वांना विसर पडल्याचे दिसले.
(Oscar 2017 : दिग्गजांसोबत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीना श्रद्धांजली)
  •