‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचा मंचावर प्रभुदेवा आणि गणेश आचार्य यांनी हजेरी लावली होती. या भागात रेमो डिसुझाच्या 'एबीसीडी' सिनेमातील प्रमुख कलाकार एकत्र आले होते. यावेळी ‘एबीसीडी’ चित्रपटातील ‘रत्ती पत्ती’ या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट नृत्य सादर केले.
कॅप्टन पुनितने या तिघांना एकमेकांच्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य करण्याची विनंती केली. त्याची विनंती प्रभुदेवा, गणेश आणि रेमोने मान्य केली. गणेश आचार्यने रेमोच्या ‘सेल्फी ले ले रे’ या गाण्यावर आपल्या बॉलिवूड शैलीत नृत्य केले; तर गणेश आचार्यच्या ‘तातड तातड’ या गाण्यावर प्रभुदेवा थिरकला आणि रेमोने प्रभूदेवाच्या ‘गंदी बात’ गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात या नामवंत नर्तकांना दुसऱ्याच्या गाण्यांवर नाचताना पाहून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. प्रभुदेवाने आपल्या अत्यंत गाजलेल्या ‘उर्वशी उर्वशी’, ‘मुकाबला मुकाबला’ आणि ‘चिंता ता तिता ता’ या गाण्यांवर परफॉर्म करत प्रेक्षकांनाकडून वन्स मोअरची दाद मिळवली.
यावेळी रेमोने एबीसीडी चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळेच्या प्रभुदेवाचे काही किस्से सांगितले. प्रभुदेवा हा स्वभावाने अगदी लाजरा असून ज्या डान्सच्या स्टेप्स आपल्याला बघूनच अवघड वाटतात त्या तो पटकन करतो. अशेच काही किस्से धर्मेश आणि राघव जुयाल यांनीही सांगितले. प्रभुदेवा कोणताही डान्स केवळ 15 मिनिटांत शिकतात आणि तो इतका अचूक सादर करतात की नंतर त्यांना काय शिकवायचे असा प्रश्न पडतो, असे या दोघांनी सांगितले. यानंतर त्यांना गणेश आचार्यची साथ लाभली. तो त्यात एका चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी सहभागी झाला होता. प्रभुदेवा आणि गणेश यांच्यासारखे कलाकार आपल्याला मित्र म्हणून लाभले, याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, असे सांगून रेमो म्हणाला की हे दोघे जरी नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रातच असले, तरी त्यांच्यात एक चांगले नाते आहे. कोणताही नृत्यविषयक चित्रपट त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, असेही रेमो म्हणाला. वरूण धवन आणि श्रध्दा कपूर यांच्या भूमिका असलेल्या आपल्या आगामी चित्रपटातील नृत्याच्या तालमींना आपण प्रभुदेवासह सुरुवातही केल्याचे त्याने सांगितले.