बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेचा विषय आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या संबंधांमुळे जॅकलिन चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईओडब्ल्यूने यापूर्वी अनेक मोठे खुलासे केले होते. त्याचवेळी, जॅकलिन सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्याबाबत एक नवा खुलासा झाला आहे.
रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जॅकलिनने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानला सांगितले की तिला सुकेशसोबत लग्न करायचे आहे. मात्र, दोन्ही कलाकारांनी जॅकलिनला सुकेशबाबत सावध केले होतं. रिपोर्टनुसार, तपासासाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये सामील असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "जॅकलिनला तिच्या सहकलाकारांनी सुकेशपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता, परंतु अभिनेत्री सुकेशला भेटत राहिली आणि अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या."
तिसरे समन्स जारी करत दिल्ली पोलिसांनी अभिनेत्रीला हजर राहण्याची सक्त सूचना दिली होती. त्यानंतर अखेर आज ती चौकशीला हजर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, EOW च्या सहआयुक्त छाया शर्मा, विशेष आयुक्त रवींद्र यादव आणि सुमारे ५ ते ६ अधिकारी जॅकलिनची चौकशी करत आहेत.
जॅकलिनची चौकशी का?ईडीने २१५ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे ७ कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या ३ पर्शियन मांजरी, सुमारे ५२ लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा, १५ जोड्या इअर-रिंग्ज, कॉइल, डायमंड सेट, मौल्यवान क्रॉकरी, गुच्ची आणि चॅनेलसारख्या महागड्या ब्रँडच्या डिझायनर बॅग्ज, जीमी चू, गुच्ची या ब्रँड्सचे पोशाख, लुई व्हिटॉनचे शूज, दोन हमी ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार तसेच महागडी रोलेक्स घड्याळे भेट दिली. एवढेच नाही तर जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, जॅकलिनला सुकेशच्या काळ्या कारनाम्यांची माहिती होती, परंतु तरीही तिने त्याच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या. त्यामुळे तिची चौकशी सुरू आहे.