काल देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन घडले. याचवेळी हवाईदलाच्या लढाऊ विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. देशाकडे असलेल्या शस्त्र-अस्त्रांचे दर्शनही यावेळी घडवण्यात आले. याचदरम्यान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी राजपथावरील संचलनाबद्दल असे काही ट्वीट केले की, ते सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले.
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींप्रमाणे ऋषी कपूर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. मात्र सोबत सरकारकडे एक खास विनंतीही केली. ‘ पुढील वर्षापासून भारतीय सिनेसृष्टीतील (जी संपूर्ण जगातील सर्वाधिक मोठी आहे) लोकांचे संचलन दाखवण्याची विनंती मी भारत सरकारला करतो. भारतीय सिनेमाचे सर्व कलाकार या परेडमध्ये भाग घेतील. जगाला आमचा सहभाग दिसायला हवा. आम्हा सर्वांना भारतीय असल्याबद्दल अभिमान आहे, जय हिंद,’ असे ट्वीट त्यांनी केले.
त्यांच्या या ट्वीटनंतर लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले. शायर-... नावाच्या ट्वीटर हँडलवरून ऋषी यांना ट्रोल केले गेले. ‘लगभग सारा बॉलीवुड तो भारतीय सभ्यता और भारतीय एकता को नष्ट करने में जुटा पड़ा है, और ख्वाब देखिये जनाब के’ असे या युजरने लिहिले.
अन्य एका युजरनेही ऋषी कपूर यांच्या ट्वीटवर कडक प्रतिक्रिया दिली. ‘काहीही गरज नाही. आम्ही अनुराग कश्यपला कदापि पाहणार नाही,’ असे या युजरने लिहिले. हिंदू नावाच्या एका हँडलने लिहिले, ‘आदरणीय ऋषीजी, तुमचा विचार चांगला आहे. पण अर्धी इंडस्ट्री देशविरोधी तत्त्वांची समर्थक असताना हे कसे शक्य आहे.’