मराठी नाट्यसृष्टीतील सर्वात लोकप्रिय नाटक 'वस्त्रहरण' पुन्हा एकदा प्रेक्षकांना रंगभूमीवर पाहता येणार आहे. वस्त्रहरण या नाटकातील मच्छिंद्र कांबळी यांची भूमिका प्रेक्षक आजदेखील विसरू शकलेले नाहीत. आता नव्या वस्त्रहरण या नाटकात मच्छिंद्र कांबळी यांनी साकारलेल्या तात्या सरपंचांची भूमिका दिगंबर नाईक साकारणार आहे.
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शनतर्फे 'वस्त्रहरण'मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मालवणी भाषेतील गोडवा अनुभवता येणार आहे. कविता मच्छिंद्र कांबळी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. प्रसिद्ध वस्त्रहरण या नाटकाचे लेखन गंगाराम गवाणकर यांनी केले होते तर दिग्दर्शन रमेश रणदिवे यांचे होते. या नाटकाने रंगभूमीवर अनेक विक्रम रचले होते. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात आपल्याला नुकतेच रेशम टिपणीसला पाहायला मिळाले होते. रेशमने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये देखील तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर आता रेशम प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. रेशम अनेक वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे. मराठी रंगभूमीवरील सगळ्यात लोकप्रिय नाटक वस्त्रहरण मध्ये रेशम एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. वस्त्रहरण या जुन्या नाटकात देखील रेशम टिपणीसने काम केले होते. या नाटकात रेशम आणि दिगंबर यांच्यासोबतच मंगेश कदम, मुकेश जाधव, प्रणव रावराणे, देवेंद्र पेम, मनमीत पेम, अंशुमन विचारे, प्रदीप पटवर्धन, समीर चौघुले, सचिन सुरेश, किशोर चौघुले, मयुरेश पेम, शशिकांत केरकर, मिथिल महाडेश्वर, विश्वजीत पालव, किशोरी आंबिये यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मराठी रंगभूमीवरील रेकॉर्डब्रेक नाटक ठरलेल्या 'वस्त्रहरण'चे आजवर शेकडो प्रयोग झाले आहेत. २०१२ मध्ये सादर झालेल्या सेलिब्रिटी वस्त्रहरणचेही खास ३१ प्रयोग झाले होते. त्यात अनेक दिग्गज कलाकारांनी देखील काम केलं होतं. वस्त्रहरण या नाटकाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने हे नवीन वस्त्रहरण नाटक देखील रसिक डोक्यावर घेणार यात काहीच शंका नाही.