अभिनेत्री रेश्मा शिंदे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा मधून घराघरात लोकप्रिय झाली. नुकतीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता रेश्मा लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने रंग माझा वेगळा मालिका टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले आहे.
घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेत जानकी ही भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, ‘रंग माझा वेगळा मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. स्टार प्रवाहने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन जानकी साकारण्याची संधी दिली आहे.
''मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले''
पुढे ती म्हणाली की, जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली. माझ्या स्टार प्रवाहच्या परिवारात पुन्हा येतेय याचा वेगळा आनंद आहे.