Join us

REVEIW: सुलतान - कुस्तीवर आधारित मसालापट

By admin | Published: July 06, 2016 3:36 PM

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा 'सुलतान' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे, चित्रपट नेमका कसा आहे जाणून घेऊया

रेटिंग - 3/5 स्टार
शिवराज यादव / जान्हवी सामंत - 
मुंबई, दि. 06 - बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा 'सुलतान' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. 'सुलतान' चित्रपटात सलमान खानने एका कुस्तीपटूची भुमिका निभावली आहे. हरियाणामधील छोट्या गावात राहणारा सुलतान आयुष्यात एक घटना घडते आणि त्यानंतर कुस्तीपटू होऊन एक दिवस वर्ल्ड चॅम्पिअन बनतो. आणि त्यानंतर घडलेली दुसरी घटना ज्यामुळे पेहलवानी सोडून देतो. पण मग पुन्हा तो रिंगमध्ये कसा परततो आणि पुढे काय होतं ? ही या चित्रपटाची कथा. 
 
सलमान खान असल्याने एक चित्रपट सुपरहिट बनवण्यासाठी जो फॉर्म्यूला वापरतात ते सर्व करण्यात आलं आहे.  चित्रपटात इमोशन, ड्रामा, कॉमेडी आणि खूप सारा अॅक्शन आहे.. एका चित्रपटाला पुर्ण मसालापट बनवण्याचे सर्व फंडे यामध्ये वापरण्यात आले आहेत त्यामुळे प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन होतं. सलमान खानला एकाच चित्रपटात इतक्या वेळा शर्टलेस पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना कदाचित मिळणार नाही. त्यामुळे अनेक सीन्समध्ये टाळ्या आणि शिट्या पडतात. सुलतानच्या निमित्ताने सलमानची ईदमध्ये हिट चित्रपट देण्याची परंपरा कायम राहिली असं म्हणायला हरकत नाही. 
 
सलमान खानने चित्रपटात मुख्य सुलतानची भुमिका निभावली आहे. सुलतानच्या आयुष्यातील दोन भाग दाखवण्यात आले आहेत. एक कुस्तीपटू बनण्याआधीचा आणि दुसरा नंतरचा. दुस-या भागात सलमान खानला कुस्तीपटू म्हणून स्विकारणं सोप्प जातं. पण पहिल्या भागातही त्याची शरिरयष्टी तेवढीच आहे त्यामुळे याने आत्ताच कुस्तीपटू बनण्याचा निर्णय घेतला हे थोडं खटकतं. सलमानला तरुण दाखवताना डायरेक्टरला विशेष मेहनत घ्यावी लागली असणार हे नक्की. सलमानने त्याच्या स्टाईलने अभिनय केला आहे, जो प्रेक्षकांना आवडतो. आरशासमोर उभा राहून आपलेलं वाढलेलं पोट पाहून रडणारा सलमान खान प्रेक्षकांना नक्कीच आवडतो. पण काही ठिकाणी का उगाच इमोशनल होता ? असं वाटतं. कुस्ती सोडून इतकी वर्ष झालेला सलमान जेव्हा रिंगमध्ये उतरतो तेव्हा पुन्हा चॅम्पिअन होतो. म्हणजे अजून 20 वर्षांनी जरी त्याला रिंगमध्ये आणलं असत तरी तो जिंकलाच असता असं वाटून जातं. 
 
अनुष्का शर्मानेही चित्रपटात कुस्तीपटूची भुमिका बजावली आहे. अनुष्का शर्माला कुस्तीपटू म्हणून मान्य करणं कठीण जातं. म्हणजे ती शिकतीये, किंवा सुरुवात करतीये असं दाखवलं असतं तर एक वेळ पटलं असतं. अनुष्काने हरियाणी मुलीची भुमिका निभावली आहे. आता अनुष्काचे चित्रपट आठवल्यावर कोणता चित्रपट आहे ज्यामध्ये ती पंजाबी बोलत नाही हे आठवणं कठीण जातं. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची इच्छा ठेवणारी अनुष्का एका क्षणात कुस्ती सोडून देते आणि दुस-या ठिकाणी सलमानलाही वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी नको जाऊ सांगते असं कसं ? हा प्रश्न पडतो. तिच्या भुमिकेबाबत डायरेक्टरच्या मनात गोंधळ झाला असावा त्यामुळे ती दुहेरी वाटते. 
 
चित्रपटात रणदीप हुडा आणि अमित साधदेखील आहेत. रणदीप हुडा प्रशिक्षकाच्या भुमिकेत दाखवण्यात आला आहे तर अमित साध सलमानच्या मॅनेजरची भुमिका निभावतो. आता सलमान असल्यावर इतर अभिनेत्यांचं काय होणार..तेच यांचं झालं. दोघांनाही हवा तसा वाव मिळत नाही. थिएटरमधून बाहेर पडताना लक्षात राहतो तो फक्त सलमान खान. 
 
चित्रपटाची लांबी डायरेक्टरने कमी केली असती तरी चाललं असतं. मध्यांतर आणि शेवटी अनेकदा चित्रपट संपला कसा नाही ? असं वाटतं राहतं. क्लायमॅक्सवेळी काही सीन्सची गरज नव्हती. ते डिलीट करुन चित्रपटाची लांबी कमी केली असती तर प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन झालं असतं. 
 
थोडक्यात सांगायचं तर चित्रटात एक पेहलवान आहे ज्याची स्वताशी लढाई सुरु आहे आणि त्यात तो जिंकतो की नाही ?  हे म्हणजे सुलतान चित्रपट. सलमान खानच्या चाहत्यांना चित्रपट आवडणार हे नक्की...कारण त्यांना हवं असलेलं सर्व या चित्रपटात आहे. चित्रपट करोडोंची कमाई करेल यात काही शंका नाही. मनोरंजन म्हणून पाहायचा असेल तर  'सुलतान' पाहायला हरकत नाही.