Join us  

REVIEW : आमिरच्या रंगात रंगलेला 'दंगल' ठरणार माईल स्टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 2:50 PM

महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनाचा संघर्ष दाखवणारा दंगल हा आमिरच्या रंगात पूर्णपणे रंगला आहे.

जान्हवी सामंत
' म्हारी छोरियां छोरों से कम है के?'  हा सुप्रसिद्ध डायलॉग, परफेक्शनिस्ट आमिरने महावीर सिंग यांच्या भूमिकेत जीव ओतून केलेल काम, त्यासाठी घेतलेली शारिरीक मेहनत, कुस्तीवीरपटूंच्या भूमिकेतील नायिकांचाही अनोख अंदाज.. या सर्वांमुळेच प्रदर्शनापूर्वीच ' दंगल'ची अच्छी खासी हवा तयार झाली होती. इतर चित्रपटांप्रमाणेच आमिरने या चित्रपटासाठी झोकून देऊन काम केले असून हा चित्रपट पूर्णपणे त्याच्याच रंगात रंगला आहे, मात्र असे असले तरी गीता-बबिताच्या भूमिकेतील मुलींसह साक्षी तन्वर, गिरीश कुलकर्णीसह सर्वजण चित्रपटात आपली स्वत:ची एक वेगळीच छाप उमटवून जातात, हेही तितकंच खरं. 
चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते अगदी गाण्यांनीदेखील चाहत्यांच्या मनावर गारूड केले आहे.  शिवाय या चित्रपटातून समाजातील चुकीच्या चालीरितीवर कठोर भाष्य करण्यात आले आहे. परंतु हा चित्रपट प्रत्यक्ष पाहताना हे भाष्य कठोर नाही तर विनोदी व तेवढेच प्रेमळ वाटते यात दिग्दर्शकाचे खरे कौशल्य आहे. 
महावीर सिंग फोटगच्या भूमिकेतील आमिर खान आपल्या तिसºया मुलीच्या जन्मानंतर ‘मारा सपना तो छोरा ही पुरा कर सकेंगा’ असे म्हणतो. तेव्हा ही एकच ओळ भारतातील पुरातन मानसिकता, मुलांबाबत असलेल्या मूर्ख मान्यता, मुलींची असुरक्षितता व त्यांच्या क्षमतांना कमी दाखविणारी ठरते. दंगल हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या प्रवासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे यात वादच नाही. 
महावीर सिंग फोगट व त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता व बबीता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट म्हणजे, एक प्रेरणादायी व्यक्ती जी आपल्या मुलींना पुरुषांचे वर्चस्व मानल्या जाणा-या खेळात प्राविण्य मिळवून देते व सर्व अडथळ्यांना पार करून त्यांच्यात एक नवी ऊर्जा व प्रेरणा पेरतो. त्याचाच हा प्रवास म्हणजेच ' दंगल'
 
महावीर सिंग फोगट (आमिर खान) यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये विजय मिळविला, मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले. याचे शल्य त्यांच्या कायम मनात आहे. महावीरच्या मनात आपले अपूर्ण स्वप्न आपला मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुश्ती स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून पूर्ण करेल असा विश्वास आहे. मात्र अंधविश्वासी समाजात जगणारा महावीर मुलाच्या लालसेपोटी चार मुलींना जन्म घालतो. महावीर हे सत्य मानून चालतो की, त्याचे स्वप्न कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही आणि ते फक्त मुलगाच पूर्ण करू शकेल. मात्र अचानक एक दिवस त्याच्या मोठ्या दोन मुलींमधील लढाऊ बाणा (फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा) त्याच्या नजरेस पडतो आणि पुढील चित्रपट घडतो. कुस्ती हा विषय दंगल चित्रपटात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्याला उबदार आख्यायिका, तिरकस विनोद व मायेची सुंदर झालर प्राप्त झाली आहे. 
चित्रपटामध्ये कुस्ती या खेळाबद्दलची अमर्याद आवड दाखविण्यात आली आहे. कुस्तीमधील काही कंटाळवाण्या वाटणा-या गोष्टींना विनोदाची झालर लावून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण परिदृश्य, खेडूत व्यायाम, बोलभाषा या चित्रपटाला रटाळ  करीत नाही. महावीर आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलींसाठी किती कठोर होऊ शकतो व त्याची शिस्त दाखविण्यासाठी मुलींना पाण्यात ढकलून देतो हे दृश्य इंटरव्हलपूर्वी गुंफण्यात आले आहे. 
आपल्या मुलींसाठी महावीरने एक मार्ग आखला आहे. सुरुवातीला मुलीदेखील याला थोडा विरोध करतात. मात्र आपल्या आंतरिक भावनांना मुरड घालत त्या आपले केस कापून घेतात, आपल्या आवडीच्या पाणीपुरीचा व लोणच्याचा त्याग करतात. लवकरच गीता कु श्तीसाठी तयार होते. मात्र महिला कुश्तीपटू नसल्याने पुरुष पहेलवानांशी त्याना लढावे लागते. ती पहिली कुश्तीमध्ये पराजित झाल्याने तिच्यासाठी हे शरमेने मान खाली घालणारे ठरते. हिची तिची महत्त्वकांक्षा पुनर्जिवित करण्याचे कारण आहे. झायरा वसीमने लहाणपणीच्या गीतामध्ये जान भरली आहे. 
दुस-या भागात महावीरच्या प्रशिक्षणात मोठी झालेली गीता कुश्तीच्या दुनियेत प्रवेश करते. येथे गीताची क था सुरू होते. वडिलांच्या प्रशिक्षणात शिकलेली गीता आता राष्ट्रीयस्तरावरील विजेती आहे. ती पदवीप्राप्त आहे, पण वडिलांनी दिलेले धडे व आपल्या व्यावसायिक प्रशिक्षकाकडून मिळालेले धडे यात तिचा संघर्ष निर्माण होतो. येथे गीता व महावीर यांच्यात वाद निर्माण होतो व ती स्वत:ची शैली निर्माण करण्याचा प्रयत्न करते. जेवढ्या ताकदीची कथा तेवढ्याच ताकदीचा चित्रपट असे ‘दंगल’बाबत म्हणायला हवे.