ऑनलाइन लोकमत
स्टार : 2.5
कलाकार : रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय-बच्चन, फवाद खान
दिग्दर्शक : करण जोहर
मुंबई, दि. 28 - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'ए दिल है मुश्किल' अखेर ब-याच वादांनंतर आज बॉक्सऑफिसवर झळकला. सिनेमाचा टीझर, ट्रेलर, संवाद, म्युझिक आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भंग झाल्याचे दिसून आले. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, स्टुडंट ऑफ द इअर आणि बॉम्बे टॉकीजसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केल्यानंतर करण जोहरने रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय-बच्चन आणि पाकिस्तानी कलाकार फवाद खान यांना सोबत घेऊन 'ए दिल है मुश्किल' सिनेमाची निर्मिती केली, ज्याची कहाणीदेखील क्युपिड लव्हस्टोरीप्रमाणेच आहे.
सिनेमाच्या कथेत अयानचे (रणबीर कपूर) आयुष्यात गायक बनण्याचे स्वप्न असते, मात्र वडिलांच्या भीतीने तो एमबीएचे शिक्षण पूर्ण करतो. एमबीएचे शिक्षण घेत असतानाच त्याची ओळख अलीजेहसोबत (अनुष्का शर्मा) होते, यावेळी अयान अलीजेहवर एकतर्फी प्रेम करू लागतो, मात्र अलीजेहकडून केवळ मैत्रीचे नाते असते. याचदरम्यान, स्टोरीमध्ये एन्ट्री होते सबा तालियार खानची (ऐश्वर्या राय-बच्चन). नात्यांच्या घोळात निर्माण होणारी मैत्री, प्रेम, एकतर्फी प्रेम, प्रेमभंग आणि त्यातून नव्याने निर्माण होणारा गोंधळ याचेच सर्व प्रदर्शन मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी बरीच चर्चा होती ती म्हणजे रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या लव्ह सिन्सची, नक्कीच या दोघांच्या लव्ह सिन्समुळे सिनेमाला गरमागरम मसाला मिळाला आहे. मात्र, अनुष्काच्या तुलनेत ऐश्वर्याची भूमिका खूपच लहान आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अनुष्का शर्मा यांचे तुम्ही जर फॅन आहात, तर हा सिनेमा तुम्हाला नक्की आकर्षित करेल. सिनेरसिक सिनेमामध्ये आकर्षित होण्याचे दुसरे कारण म्हणजे सिनेमामध्ये शाहरुख खान, लिसा हेडन आणि आलिया भट्ट पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. सिनेमामध्ये शाहरुख आणि ऐश्वर्या या दोघांचा जास्त वापर करता येऊ शकला असता, मात्र दिग्दर्शकाला त्यांच्या अभिनया, कौशल्याचा ताळमेळ बसवणे जमले नाही.
त्यात दोघांचीही एन्ट्री मध्यांतरच दाखवण्यात आली आहे. दरम्यान सिनेमाच्या मध्यांतरनंतरचा भाग बराच लांबवल्याने, सिनेमा खपूच गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट वाटतो. सिनेमाचे शुटिंग लोकेशन भन्नाट आहेत. या सिनेमाचे शुटिंग लंडन, पॅरिस, ऑस्ट्रियासोबत भारतातही करण्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी हा सिनेमा एक संगीत आणि आकर्षक दृश्यांची मेजवानी ठरू शकतो. एकूण रिलीज होण्यापूर्वी ब-याच चर्चेत असलेला हा सिनेमा फुसका बार निघाल्याने आता सिनेमा बॉक्सऑफिसवर किती कमाई करणार हे लवकरच स्पष्ट होईल.