1921 Movie Review : जुनाट कथेमुळे ‘१९२१’ मधील ‘आत्मा’ भटकला !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:46 AM2018-01-12T11:46:54+5:302018-01-19T15:24:17+5:30
‘राज, राज रिबूट, १९२०’ यांसारख्या हॉरर चित्रपटांचा दांडगा अनुभव असलेले दिग्दर्शक विक्रम भट्ट ‘१९२१’ या त्यांच्या नव्या हॉररपटात प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट दाखवतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रेक्षकांच्या या अपेक्षांवर त्यांनी पूर्णत: पाणी फिरवल्याचे दिसून येत आहे.
‘राज, राज रिबूट, १९२०’ यांसारख्या हॉरर चित्रपटांचा दांडगा अनुभव असलेले दिग्दर्शक विक्रम भट्ट ‘१९२१’ या त्यांच्या नव्या हॉररपटात प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट दाखवतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रेक्षकांच्या या अपेक्षांवर त्यांनी पूर्णत: पाणी फिरवल्याचे दिसून येत आहे. कारण प्रत्येक दृश्याची प्रेक्षकांना भविष्यवाणी करता येईल अशी कमकुवत कथा असल्याने चित्रपट जसजसा पुढे जातो तसा त्यातील ‘आत्मा’ निघून जात असल्याची जाणीव होते. एका वाक्यात सांगायचे झाल्यास, जुनाट फॉर्म्युला असलेला हा हॉररपट प्रेक्षकांची पुरती निराशा करतो.
चित्रपटाची कथा आयुष (करण कुंद्रा) याच्यापासून सुरू होते. पियानो आर्टिस्ट असलेला आयुष संगीत शिकण्यासाठी भारतातून इंग्लंडला जातो. मिस्टर वाडिया त्याला त्यांचा ब्रिटनस्थित बंगला राहायला देतात. तिथे जेमतेम एक महिना होतो तोच त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून जाते. वास्तविक तो ज्या बंगल्यात राहतो, त्या बंगल्यातील एक दरवाजा त्याच्याकडून नकळतपणे उघडला जातो. ज्यामुळे त्याला वाईट आत्मांचा सामना करावा लागतो. पुढे तर त्याचे आयुष्य एवढे खडार होते की, वर्तमान सुरक्षित करण्यासाठी त्याला भूतकाळातील अनेक रहस्यांना सामोरे जावे लागते. याचदरम्यान त्याची भेट रोज (जरीन खान) हिच्याशी होते. रोज त्या सर्व भूतप्रेतांना बघू शकते, जे आयुषचा पाठलाग करीत असतात. या भूतप्रेतांपासून आयुषची सुटका करण्यासाठी रोज प्रयत्न करते.
त्यानंतर काय होत असेल हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. कारण चित्रपट बघत असताना ही कथा यापूर्वीही आपण बघितली आहे, किंबहुना याच दिग्दर्शकाच्या इतर हॉररपटांमध्ये या कथेची झलक बघावयास मिळाली आहे, अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक दिग्दर्शन आणि लोकेशन उत्कृष्ट आहे. परंतु कथा खूपच कमकुवत असल्याने त्यात नावीन्य वाटत नाही. विशेष म्हणजे, या दृश्यानंतर पुढे काय घडेल याची भनक अगोदरच प्रेक्षकांना लागत असल्याने त्यात नावीन्य राहत नाही. चित्रपटाचा क्लायमॅक्स सोडला तर संपूर्ण चित्रपट तोच जुनाट फॉर्म्युला घेऊन बनविला असावा, असे वाटते.
वास्तविक कथेवर आणखी काम केले गेले असते तर कदाचित चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडता आला असता. अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला करण कुंद्रा याअगोदर, ‘बेतााब दिल की तमन्ना’ आणि ‘जरा नचके दिखा’ या रिअॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाला आहे. त्याचबरोबर त्याने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अशात १९२१ मध्ये तो दमदारपणे आपल्या अभिनयाची छाप सोडून जाईल असे बोलले जात होते. मात्र कथाच कमकुवत असल्याने त्याचे प्रयत्न अपुरे वाटतात. जरीनने रोमान्सव्यतिरिक्त भूतप्रेतांशी सामना करण्याची आपली जबाबदारी खुबीने पार पाडली आहे. परंतु ती यापेक्षाही उत्कृष्ट अभिनय करू शकली असती.
चित्रपटातील ‘सुन ले जरा’ हे गाणं काहीकाळ प्रेक्षकांना रोमान्सच्या दुनियेत घेऊन जाते. त्याचबरोबर ब्रॅकग्राउंड स्कोअरही चांगला असल्याने चित्रपटातील संगीत छाप सोडून जाते. मात्र संगीताला दमदार कथेची साथ लाभत नसल्याने चित्रपट उगाचच ओढून ताणून बनविला तर जात नाही ना? अशी शंका येते. एकूणच तुम्ही जर हॉरर चित्रपटाचे चाहते असाल तरच हा चित्रपट बघण्याचे धाडस करा अन्यथा न बघितलेला बरा.