Join us

Aankh Micholi Movie Review : हास्य-विनोदाची आंधळी कोशिंबीर, मृणाल ठाकूरचा 'आँख मिचोली' कसा आहे?

By संजय घावरे | Published: November 04, 2023 5:32 PM

शीर्षकावरून सिनेमात काय दडलंय याचा थांगपत्ता लागत नाही, पण काहीतरी विनोदी असेल याचे संकेत मिळतात. हा चित्रपट म्हणजे केवळ हास्य-विनोदाची आंधळी कोशिंबीर आहे.

Release Date: November 03, 2023Language: हिंदी
Cast: मृणाल ठाकूर, अभिमन्यू दासानी, परेश रावल, शरमन जोशी, दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी, दर्शन जरीवाला, विजय राज, ग्रुशा कपूर
Producer: आशिष वाघ, उमेश शुक्लाDirector: उमेश शुक्ला
Duration: २ तास २४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

शीर्षकावरून सिनेमात काय दडलंय याचा थांगपत्ता लागत नाही, पण काहीतरी विनोदी असेल याचे संकेत मिळतात. 'ओएमजी' आणि '१०२ नॅाट आऊट'सारखे चित्रपट बनवणाऱ्या उमेश शुक्लांनी याचं दिग्दर्शन केलं असल्याने अपेक्षा वाढल्या होत्या, पण चित्रपट पाहिल्यावर त्या पूर्ण होत नाही. हा चित्रपट म्हणजे केवळ हास्य-विनोदाची आंधळी कोशिंबीर आहे.

कथानक : प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यंग असलेल्या होशियारपूरमधील एका कुटुंबाची हि कथा आहे. वडील नवज्योत सिंहना विसरण्याचा आजार आहे. थोरला मुलगा युवराज बहिरा, तर धाकटा मुलगा हरभजन बोलताना अडखळतो. याच कुटुंबातील पारोला रात्री न दिसण्याचा आजार आहे. स्वीर्त्झलँडला गेलेल्या पारोला तिथे एक तरुण खूप आवडतो, पण त्या दोघांची भेट होत नाही. इकडे वडीलांनी पारोचे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिला पाहायला मुलगा येणार असतो. पारो मात्र मुलाला फसवून किंवा खोटं सांगून लग्न करायला तयार नसते. त्यावर कुटुंबिय तिची समजूत घालतात आणि मुलगा पारोला पाहायला येतो. त्यानंतर झालेली धमाल चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : बिनबुडाची कथा हा या चित्रपटाचा सर्वात मोठा मायनस पॅाईंट आहे. विनोदनिर्मिती करणारे संवाद असल्याने थोडं मनोरंजन होतं, पण डोकं बाजूला ठेवून हा चित्रपट पाहावा लागतो. तगड्या कलाकारांच्या परफॅार्मन्सच्या आधारे उणिवांवर पांघरूण घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट कोरोनाच्या काळातील असल्याने रखडलेला असून, वर्तमान काळातील वाटत नाही. काही ठिकाणी विनोदी पंचेस हसवतात, पण विनाकारण विनोदी दृश्यांचा भरणा केल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्समध्ये परेश रावल जे सांगतात ते ऐकून शुक्लांसारख्या दिग्दर्शकाने अशा प्रकारे क्लायमॅक्स केल्याचं वाईट वाटतं, पण पुढच्याच दृश्यात झालेला गैरसमज दूर केला आहे. क्लायमॅक्सनंतरचा विनोदी पंच सर्वात भारी आहे. संगीत प्रभावी नसून, सिनेमॅटोग्राफी आणि इतर तांत्रिक गोष्टीही साधारणच आहेत. 

अभिनय :मृणाल ठाकूर एक उत्तम अभिनेत्री आहे, पण तिचा अचूक वापर करून घेता आलेला नाही. मूळात मृणालने अशा प्रकारचा चित्रपट का स्वीकारला हे समजत नाही. अभिमन्यू दासानीने नेहमीप्रमाणेच चांगलं काम केलं असलं तरी शब्दोच्चारांमुळे मागे पडतो. कुठेही दोघांची केमिस्ट्री दिसत नाही. परेश रावल, शरमन जोशी, अभिषेक कपूर यांनी यापूर्वी साकारलेल्या विनोदी व्यक्तिरेखा पाहता इथे त्यांचे टॅलेंट वाया घालवले आहे. दिव्या दत्ता बऱ्याच ठिकाणी लाऊड वाटते. विजय राज आपल्या नेहमीच्या शैलीत पुन्हा भाव खाऊन गेला आहे. दर्शन जरीवाला आणि ग्रूशा कपूर यांनीही चांगली साथ दिली आहे. 

सकारात्मक बाजू : हलके फुलके संवाद, विनोदनिर्मितीनकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संगीतथोडक्यात काय तर फार अपेक्षा ठेवून हा चित्रपट पाहायला जाल तर निराश व्हाल. केवळ टाईमपास आणि विनोदासाठी हा चित्रपट पाहता येऊ शकेल.

टॅग्स :मृणाल ठाकूरपरेश रावल