आई, मुलगा यांच्या नात्यावरती भाष्य करणारे अनेक चित्रपट आजवर मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळाले. आरॉन देखील अशाच काहीशा विषयावर आहे. पण त्याचसोबत एक काका आणि पुतण्या मधील खूप छान नाते या चित्रपटात मांडण्यात आले आहे.
आरॉन ऊर्फ बाबू (अथर्व पाध्ये) कोकणात आपल्या काका-काकीकडे (शशांक केतकर आणि नेहा जोशी) राहत असतो. त्याचे काका काकी त्याचे सगळे लाड पुरवत असतात. त्या दोघांसाठी तो सर्वस्व असतो. बाबूची आई (स्वस्तिका मुखर्जी) पॅरिस मध्ये राहत असते. खरे तर बाबूचा जन्म देखील तितलाच असतो. तो लहान असताना त्याच्या वडिलांचे एका अपघातात निधन होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. त्याचा सांभाळ योग्य रीतीने व्हावा यासाठी त्याची आई त्याला त्याच्या काका काकीकडे ठेवते. पण ती न चुकता त्याला पत्र लिहीत असते. तू दहावी झाल्यावर पॅरिसला ये असे तिने त्याला पत्रांद्वारे सांगितलेले असते. बाबूचे काका काकीसोबत नाते खूपच छान असले तरी त्याला आपल्या खऱ्या आईला भेटण्याची ओढ असते. त्यामुळे तो दहावी झाल्यावर काका सोबत पॅरिसला जातो. तिथे गेल्यावर काय घडते, बाबूची आपल्या खऱ्या आईसोबत भेट होते का हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
चित्रपटाची मूळ कथा चांगली असली तरी ती मध्यांतरानंतर भरकटल्यासारखी वाटते. बाबू आणि त्याचा काका पॅरिसला गेल्यानंतर त्यांना जॅक नावाचा एक माणूस भेटतो, तो त्यांना त्याची आई शोधायला मदत करतो, त्यानंतर तिथली एक पेंटर देखील या शोधकार्यत स्वतःला झोकून देते या गोष्टी मनाला पटत नाहीत. चित्रपटाच्या कथेत उणिवा असल्या तरी शशांक केतकर, नेहा जोशी यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला तारले आहे. चित्रपटात इंग्लिश संवादाचा वापर खूप असल्याने हा चित्रपट ठराविक गटापुरताच मर्यादित झाला आहे. बाबूची प्रेमकथा चित्रपटात का दाखवली हा प्रश्न नक्कीच पडतो. चित्रपटातील गाणी ओठावर रुळत नाही.