भारतात लग्न ही अतिशय महत्वाची घटना आहे. लग्न ठरत असताना ,लग्नाच्या दरम्यान घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नेहमीच चवीने चर्चा होत असते. मात्र जांगडगुत्ता हा आहे की लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या रात्रीच्या विषयावर कधीच उघडपणे आणि खुलुन बोललं जात नाही. त्यामुळे कितीही शिक्षणाचा तोरा मिरवला तरी आपली तरूण पिढी वाट्टेल त्या मार्गाने लैगिक शिक्षणाचा अभ्यास करतात. हा अभ्यास जवळचे मित्र-मैत्रिणी, इंटरनेट,सोशल मिडिया,मासिके किंवा मिळेल त्या माध्यमातून ते करत असतात. आता ह्यामध्ये या तरूण पिढीला ही माहिती योग्य ती मिळते का ? किंवा ही तरूण पिढी या माहितीची खातरजमा करून घेते का ? हा मोठा प्रश्न आहे. यामुळे नात्यांमध्ये येणारे गैरसमज, अपुऱ्या माहितीमुळे वाढणारे भ्रम ह्याचं प्रमाण वाढत जातं. यावर उत्तम उपचार आहेत. किंवा एकमेकांना समजून घेतलं तर अनेक समस्या सुटू शकतात ह्याचा विचारच समाजात होत नाही. यावरच खुमासदार पध्दतीने भाष्य करणारा आटपाडी नाईटस हा सिनेमा.
सिनेमाची कथा अतिशय रंजक आहे. आटपाडी गावात अतिशय किरकोळ शरीरयष्टीचा ,लग्नाचा वय झालेला एक तरूण मुलगा आहे वसंत खाटमोडे ( प्रणव रावराणे) . आटपाडी गावातील मध्यमवर्गीय घरामध्ये राहणारा वश्या त्याच्या बारीक दिसण्याने गावात कुप्रसिद्ध आहे. वश्याचे वडिल बापूसाहेब खाटमोडे (संजय कुलकर्णी) आणि आई लक्ष्मी खाटमोडे (छाया कदम) आपल्या मुलाच्या लग्नासाठी चिंतेत आहेत. आधीच ९ मुलींनी वश्याला नकार दिल्याने आता येणारी १० वी मुलगी तरी होकार देईल की नाही याबद्दल सगळं घर चिंतेत आहे. वश्याचा मोठा भाऊ विलास खाटमोडे (समीर खांडेकर) आणि वहिनी मनीषा खाटमोडे ( आरती वडबाळकर) हे दोघंही वश्याच्या लग्नासाठी खटाटोप करतायत. त्यात आटपाडी गावाजवळच्या हरिप्रिया जगदाळे (सायली संजीव)चं स्थळ वश्यासाठी येतं. आणि पहिल्या भेटीतच ते एकमेकांना पसंती देतात. साग्रसंगीत लग्नसोहळा पार पाडतो. मात्र लग्न लागण्यापूर्वी वश्याची मित्रमंडळी आणि गावातील माणसं ..काय रे वश्या तुला झेपेल ना असं निंदानालस्ती करून वश्याची टर खेचतात. येणाऱ्या नवीन नवरीसमोर या गोष्टी यायला नकोत म्हणून वश्याची मित्रमंडळी त्याला शक्तिवर्धक गोळ्या घेण्याचा आग्रह करतात. त्यात पहिली रात्र तर नैय्या पार होते. मात्र नंतर घडणाऱ्या काही रंजक गोष्टींतून वश्याला आपल्या निर्णयावर पश्चाताप होतो आणि कोषात जातो. या कोषातून बाहेर जायला त्याची प्रिया त्याला मदत करते का ? त्याला येणाऱ्या अडचणींतून त्याची सुटका होईल का ? ही उत्तरं तुम्हांला सिनेमा पाहिल्यावर मिळतील. सिनेमाचा विषय सध्याच्या जगात अतिशय गरजेचा आहे. हा विषय खुमासदार पध्दतीने मांडण्याबाबत या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक नितीन सुपेकरचं कौतुकच आहे. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ठय म्हणजे या सिनेमाची स्टारकास्ट . प्रत्येक पात्र नितीन सुपेकरने अत्यंत समर्पक निवडलेलं आहे. सिनेमाचा पूर्वाध अतिशय उत्तम बांधला आहे. वश्या आणि प्रियाचा लग्न झाल्यावरील पहिल्या रात्रीचा सीन हा तर लाजवाब झाला आहे. उत्तरार्धात सिनेमातील काही गोष्टी खटकत असल्या तरी पूर्वाधातील सिनेमाचा परिणाम आणि कलाकारांच्या अदाकारीमुळे सिनेमा निश्चितच प्रशंसनीय झाला आहे. नागराज दिवाकर आणि वीरधवल पाटील यांची सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम आहे. विजय गवंडे यांनी संगीतबध्द केलेलं प्रेमाचा जांगडगुत्ता हे गाणंही मस्त झालंय.
या सिनेमाचा नायक म्हणजे प्रणव रावराणे. वसंत म्हणजेच वश्याच्या भूमिकेत प्रणवने आपल्या इतक्या वर्षाच्या रंगभूमी,सिनेमामधील अनुभवाचा पुरेपर वापर केला आहे. प्रणवच्या करिअरमधली ही उत्तम भूमिका आहे. प्रणव तसा छोट्या छोट्या भूमिकांमधून आपल्यासमोर दिसणारा एक उत्तम अभिनेता .मात्र वश्याच्या भूमिकेने तो एक समर्थ अभिनेता आहे यावर शिक्कामोर्तब झालंय. सायली संजीवने प्रियाची भूमिका समरसून केली आहे. नाटक,सिनेमातील एक उत्तम अभिनेते संजय कुलकर्णी ह्यांची बापूसाहेब खाटमोडे यांची भूमिका ही या सिनेमातील अतिशय भावखाऊ भूमिका आहे. संजय कुलकर्णी यांनी आपल्या देहबोलीतून, अदाकारीतून,संवादांतून उभी केलेली बापूसाहेबाची भूमिका निव्वळ अप्रतिम आहे. छाया कदम, समीर खांडेकर आणि आरती वडगबाळकर यांची उत्तम साथ या कलाकारांना मिळाली आहे. सुबोध भावेने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. एक उत्तम सिनेमा सुबोधने लोकांसमोर आणला आहे. त्याची सिनेमातील छोटीशी भूमिकाही उत्तम आहे. एकूणच लैंगिक शिक्षणावर एक खुमासदार अनुभव देणारा हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही.