abc marathi movie review : अनेक उणिवा असलेला अबक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 12:03 PM2018-06-07T12:03:37+5:302023-08-08T19:47:32+5:30
अ.ब.क या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत.
शिक्षणाशिवाय प्रगती करणे अशक्यच. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेणे गरजेचे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते हे खरेच आहे. त्यामुळे मुलगा-मुलगी दोघांना देखील शिक्षण दिलेच पाहिजे. आपल्या बहिणीला चांगले शिकता यावे म्हणून झगडणाऱ्या एका भावाची कथा प्रेक्षकांना अबक या चित्रपटात पाहायला मिळते.
हरी (साहिल जोशी) आणि जनी (मैथिली पटवर्धन) या दोघांच्या आई-वडिलांचे निधन झालेले असते. जनीला जन्म देताच तिची आई जग सोडून जाते तर तिच्या सातव्या वाढदिवसाला तिच्या वडिलांचा मृत्यू होतो. जनी ही अपशकुनी आहे असे गावातल्या सगळ्यांचे म्हणणे असते. त्यामुळे जनीला घेऊन हरी गाव सोडतो आणि ते दोघे रस्त्यावर राहू लागतात. जनीला शिकवून खूप मोठे करण्याची हरीची इच्छा असते. पण दोन घास खायला मिळणे देखील मुश्कील असताना शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे हा त्याला प्रश्न पडलेला असतो. रस्त्यावरूनच फिरत असताना त्यांची ओळख अजा (किशोर कदम) सोबत होते. अज्याच्या मुलांचे आणि पत्नीचे अपघातात निधन झालेले असते. तो काही अनाथ मुलांना सांभाळत असतो. हरी आणि जनी देखील काही दिवस त्याच्यासोबत राहातात. पण आपल्या हिंमतीवर पैसे कमवायचे असे ठरून हरी जनीला घेऊन एका स्मशानात राहू लागतो. जनीला शाळेत पाठवण्याचे हरीचे स्वप्न पूर्ण होते का? हरी आणि जनीच्या आयुष्यात पुढे काय होते यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना अबक या चित्रपटातच मिळतात.
आपल्या बहिणीच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या एका भावाची कथा प्रेक्षकांना भावत असली तरी दिग्दर्शक रामकुमार शेडगेला ती तितकीशी प्रभावीपणे मांडता आलेली नाही. चित्रपटात पुढे काय होणार याची आपल्याला आधीच कल्पना येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहात नाही. तसेच चित्रपटात अनेक प्रसंग उगाचच टाकण्यात आले आहेत. या चित्रपटात आपल्याला सुनील शेट्टी, तमन्ना भाटिया पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतात. खास दोघांसाठी त्यांची दृश्य चित्रपटात टाकल्यासारखी वाटतात. तसेच किशोर कदमची व्यक्तिरेखा कधी शुद्ध मराठी तर कधी कानडी टोनमध्ये मराठी बोलताना दिसते. त्यामुळे ती व्यक्तीरेखा तितकीशी स्पष्ट होत नाही. पण असे असले तरी किशोर कदमने त्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. त्याच्या आवाजात कविता ऐकणे हा तर खूपच छान अनुभव आहे. या चित्रपटात पंतप्रधानांचे भाषण, मन की बात यांसारख्या गोष्टींचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. या गोष्टींचा खरंच चित्रपटाशी काही संबंध आहे का असा प्रश्न चित्रपट पाहाताना नक्कीच पडतो. तसेच चित्रपटाचा शेवट देखील ओढून ताणून केल्यासारखा वाटतो. चित्रपटाच्या कथेत, सादरीकरणात अनेक उणिवा असल्या तरी चित्रपटात साहिल जोशी आणि मैथिली पटवर्धन या दोन्ही बालकलाकारांनी खूपच चांगले काम केले आहे.