>> संजय घावरे
इतिहासाच्या पानांमध्ये अनामिक राहिलेल्या क्रांतीकारक नायिकेची कथा या चित्रपटात दिग्दर्शक कन्नन अय्यर यांनी सादर केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांच्या जोडीने सर्वसामान्यांना एका धाग्यात बांधणाऱ्या उषा मेहता यांच्या क्रांतीकारी रेडिओची ही कथा ब्रिटिश काळात नेणारी आहे.
कथानक : सायबेरियन क्रेन्स पक्ष्यांप्रमाणे हिमालयाच्या उंचीपेक्षा उंच उडण्याचं स्वप्न पाहणारी ब्रिटिशकालीन न्यायाधीश हरिप्रसाद मेहतांची कन्या उषाची ही कथा आहे. शाळेत शिकणारी उषा गुरुजींना मारणाऱ्या पोलिसांना अडवते आणि तिथेच तिच्या मनात अनाहुतपणे क्रांतीची बीजे पेरली जातात. कायद्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या उषाच्या मनातील देशभक्तीची ज्योत गांधीजींच्या 'करो या मरो' या नाऱ्याने अधिक प्रखर होते. गांधीजींना तुरुंगात टाकल्यावर त्यांची भाषणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उषा काँग्रेस रेडिओ सुरू करते. राम मनोहर लोहिया भेटल्यावर उषाचा लढा अधिक तीव्र होते.
लेखन-दिग्दर्शन : स्वातंत्र्यलढ्याच्या पानांमधील मोजकेच हिरे आजवर जगासमोर आले आहेत. उषा मेहतांसारख्या नायिकेची स्टोरी जगासमोर आणणारी वनलाईन सुरेख आहे. पटकथेतील काही नाट्यमय वळणं उत्सुकता वाढवणारी असली तरी, घटना संथ घडल्याने खूप वाट पाहावी लागते. स्मगलरकडून रेक्टिफायर आणणं, रेडिओच्या शोधातील पोलिसांना गुंगारा देणे, रेडीओ सुरू ठेवण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी आखणं असे काही सीन उत्कंठावर्धक आहेत. करो या मरो, वतन या कफन, जय हिंद, वंदे मातरम हे नारे देशभक्तीची भावना जागवणारे असले तरी आणखी प्रभावीपणे सादर व्हायला हवे होते. 'गुमनाम नायक कोणत्याही नायकापेक्षा मोठा आहे' सारखे काही संवाद लक्षात राहणारे आहेत. सुखविंदर सिंगचं 'कतरा कतरा...' गाणं चांगलं झालं आहे. संकलनासोबत गतीकडे लक्ष देण्याची गरज होती.
अभिनय : साराला उषा मेहतांच्या व्यक्तिरेखेसाठी निवडणं हीच मोठी चूक ठरली आहे. गेटअप आणि काॅस्च्युमद्वारे ती स्वातंत्र्यकाळातील नायिका बनली असली तरी साराच दिसते. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्यासाठी तिला आणखी मेहनत घ्यावी लागेल. 'लापता लेडीज'प्रमाणे स्पर्श श्रीवास्तवने इथेही कमालीचा अभिनय केला आहे. राम मनोहर लोहियांच्या भूमिकेत इमरान हाश्मी शोभत नाही. आनंद तिवारीने प्रेमासाठी नायिकेला साथ देणाऱ्या नायकाची भूमिका छान साकारली आहे. सचिन खेडेकर यांनी साकारलेले न्यायाधीशही स्मरणात राहणारे आहेत. संग्राम साळवीने छोट्याशा भूमिकेतही जीव ओतला आहे.
सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, कला दिग्दर्शननकारात्मक बाजू : संकलन, संथ गतीथोडक्यात काय तर भारतीय स्वांतत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व अनामिक नायक-नायिकांना समर्पित केलेला हा चित्रपट एकदा पाहायला हवा.