-जान्हवी सामंत ‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे. लिटिल रेड रीडिंग हुड ही गोष्ट आपण लहानपणी अनेकवेळा ऐकली असेल. रेड रीडिंग हुड एकदा आपल्या अज्जीला भेटायला म्हणून निघते आणि रस्त्यात तिला एक लांडगा भेटतो. तिच्याशी गोड गप्पा मारत लांडगा तिच्याबद्दल सगळी माहिती काढतो, लांडगा पोहचतो तिच्या अज्जीच्या घरी. अज्जीच्या वेशात तो रेड रीडिंग हुडवर झडप घालतो. अज्जी हा चित्रपट काहिसा या गोष्टीवर आधारित आहे. फक्त या अडेप्शनमध्ये दर्शकांसाठी एक ट्विस्ट आहे. आई, वडिल आणि अज्जी सोबत राहणारी दहा वर्षाची मंदा ही आपल्या अज्जीच्या खूप जवळची असते. शिवणकाम करणाऱ्या अज्जीकरीता मंदा बऱ्याचदा ब्लाऊज पोहचविण्याचे काम करते. एकदा असेच काहीतरी काम करायला बाहेर पडली असताना, मंदा गायब होते. ती मध्यरात्री सापडते, मात्र अगदी वाईट, जखमी अवस्थते कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये. मंदावर बलात्कार झालाय आणि खूप मारहाण झालीय, हे तिच्या कुटुंबियांना कळाल्यावर ते पोलिसांची मदत घेतात. पण पोलिसांच्या प्रश्नावरुन आणि इशाऱ्यावरुन गुन्हेगार घावळे हा एक कुप्रसिद्ध बिल्डर गुंडा आहे, त्यांना लक्षात येते की, आपण गप्प राहण्यामध्येच आपली हुशारी आहे. आपल्या मुलीचे हाल-हाल झाले असूनही तिचे आई-वडील गप्प राहतात. पण अज्जी मात्र सुड घेण्याचे ठरविते. आपल्या शिकारावर ती रोखून नजर ठेवायला लागते. तो कुठे जातो, कुणाबरोबर असतो, काय करतो यावर ती डोळा ठेवायला लागते. त्याचबरोबर आपण सुड कसा उगवणार याची प्लॅनिंंग ती करते. अगदी हळुवार पद्धतीने ती शोध घेत असते. अज्जीच्या नजरेतून आपल्याला घावळेचा कु्रपणा आणि निचपणा हा तटस्थपणे जाणवतो. चित्रपटाचे स्टोरी खूपच उग्र वाटते, काही ठिकाणी तर अक्षरश: किळसवाणे आहे. पण ती या कथानकाची गरज आहे. एका दहा वर्षाच्या मुलीचा निरागसपणा एक दुष्ट नराधम उध्वस्त करु शकतो आणि म्हणून अशा नराधमाला अशीच शिक्षा झाली पाहिजे या भावना आपल्यात जागृत होतात. त्याच भावना अज्जीमध्ये आपणास दिसतात. चित्रपट अगदी हळुवार आहे, अगदी अज्जीच्या वाकून अडखलत चालली सारखा. पण या चित्रपटाचा उद्देश या समाजामधल्या सेक्शुअल वृत्तीवर आणि शिक्षा न झाल्यामुळे त्यांच्या धैर्यामुळे महिलांवर होणारे जीवघेणे गुन्हे यांच्यावर अगदी थेट मारा आहे. चित्रपट गंभीर आणि उग्र असला तरी मनोरंजक, डोळ्यात पाणी आणणारा आहे. आजुबाजूच्या थिएटरमध्ये असेल तर नक्की पाहावा.