Join us

Sooryavanshi Movie Review : जाणून घ्या कसा आहे अक्षय कुमार व रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 6:01 PM

Sooryavanshi Movie Review : ‘सूर्यवंशी’ रिलीज करेल तर चित्रपटगृहातच, हा रोहित शेट्टीचा  ‘हट्ट’ होता. जवळपास दोन वर्ष त्यानं प्रतीक्षा केली.  चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा हा ‘हट्ट’ अगदी योग्य होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Release Date: November 05, 2021Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, अभिमन्यू सिंग, रणवीर सिंग, अजय देवगण
Producer: हिरू यश जोहर, करण जोहर अरूणा भाटिया, अपूर्व मेहताDirector: रोहित शेट्टी
Duration: 2 तास 25 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

कोरोना महामारीमुळे तब्बल 19 महिने रखडून पडलेला रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज करेल तर चित्रपटगृहातच, हा रोहित शेट्टीचा  ‘हट्ट’ होता. जवळपास दोन वर्ष त्यानं प्रतीक्षा केली.  चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा हा ‘हट्ट’ अगदी योग्य होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.‘सूर्यवंशी’ म्हणजे रोहित शेट्टी टाईप टिपिकल सिनेमा. हवेत उडणा-या गाड्या, श्वास रोखणारे अ‍ॅक्शन स्टंट, हलकीफुलकी कॉमेडी आणि अक्षय कुमारसारखा ‘पैसा वसूल’ सुपरस्टार. इतका सगळा मसाला असलेला सिनेमा ओटीटीवर पाहण्यात खरी मजा ती काय होती? रोहित शेट्टी म्हणूनच अडून बसला होता. (Sooryavanshi Movie Review )

तर रोहितच्या ‘सूर्यवंशी’ची कथा आहे सूर्यवंशी या पोलिस अधिका-याची (Akshay Kumar).  पत्नी (Katrina Kaif) आणि मुलापेक्षाही नोकरी प्रिय असलेल्या सूर्यवंशी मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आई-वडिलांना गमावून बसतो. यानंतर या बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड बिलाल (कुमूद मिश्रा) आणि ओमर हफीज (जॅकी श्रॉफ) या दोघांना शोधून काढणं, हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनतं. याचदरम्यान मुंबई बॉम्ब ब्लास्टसाठी प्रत्यक्षात 1000 किलो आरडीएक्स आलं होतं. त्यापैकी केवळ 400 किलो ब्लास्टसाठी वापरलं गेलं आणि उरलेलं 600 किलो आरडीएक्स अजूनही मुंबईत लपवून ठेवल्याची गुप्त माहिती त्याला मिळते. मुंबईत पुन्हा एका मोठ्या बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरेही त्याच्या हाती लागतात. यानंतर सूर्यवंशी हा कट हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतो. सिंघम आणि सिम्बाची साथ त्याला मिळते. हे तिघं मुंबईला कसं वाचवतात, हे बघायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल.

‘सूर्यवंशी’ कसा आहे? याचं उत्तर द्यायचं झाल्यास, फुल्ल मसाला एंटरटेनर, असे तीन शब्द पुरेसे ठरतील. रोहित शेट्टीनं त्याच्या चाहत्यांना डोळ्यापुढं ठेऊन हा सिनेमा बनवला आहे. चित्रपटाचा पहिला हाफ थोडा रेंगाळतो. पण दुसरा हाफ तुम्हाला एंटरटेनमेंटची रोमांचक सैर घडवतो. अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी असं सगळं काही तुम्हाला मिळतं. पाकिस्तान आणि इस्लामी जिहाद दहशतवादाचं मूळ आहे, असं एकीकडे दाखवताना दुसरीकडे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवत रोहित शेट्टीने कमालीचा ‘बॅलन्स’ साधला आहे. हे संतुलन साधताना रोहित शेट्टी कुठेही भरकटत नाही. बॉम्ब ब्लास्टच्या एका दृश्यात मौलांना गणपतीला उचलून घेतात,असं एक दृश्य त्याचं मोठं उदाहरण आहे. काही दृश्य बालिश वाटतात. पण रोहित शेट्टीचा सिनेमा म्हटल्यावर ती असणारच. चित्रपटाचा प्लस प्वाइंट काय तर चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स. कॉप हिरोजची स्पेशल बॉडी लँग्वेज, त्यांचे दमदार डायलॉग्स हेच रोहितच्या ‘कॉप’ सिनेमांचं वैशिष्ट्य आहे आणि अक्षय त्या कसोटीवर अगदी खरा उतरला आहे. सूर्यवंशीला नाव विसरण्याचा आजार असतो. तो पत्नी रियला कधी मलेरिया तर कधी सीरिया बोलवतो... हा अक्षयचा अंदाज हसायला भाग पाडतो. कतरिनासोबतचा अक्षयचा रोमान्स, टीप ‘टीप बरसा पानी’ सारखं सेन्शुअल गाणं चित्रपटात आहे. पण ते फार अपील करत नाही.  

दुस-या हाफमध्ये रणवीर व अजयची एन्ट्री होते आणि चित्रपटात करंट येतो. कॅटरिनाच्या वाट्याला फार आलेलं नाही, तसंच जॅकी श्रॉफच्या वाट्यालाही फार कमी संवाद आणि संधी आहेत. निकितन धीर, गुलशन ग्रोव्हर, जावेद जाफरी, कुमूद मिश्रा, अभिमन्यू सिंग यांनी छोट्या भूमिकेत जीव ओतला आहे. अजय व रणवीर मात्र जबरदस्त आहेत. सिंघम-सिम्बा-सूर्यवंशी एकत्र फायरिंग करत शत्रूवर तुटून पडतात, अशी काही दृश्य मसाला चित्रपटांच्या शौकिनांना रोमांचक करतात. एकंदर काय तर रोहित शेट्टी आणि अक्षयचे चाहते असाल, मसालापटांचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा न चुकवलेलाच बरा.

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमाररोहित शेट्टी