Zombivali Movie Review: भूतं, हडळ, वेताळ या भुतावळीप्रमाणेच झॉम्बी हा प्रकार हिंदी सिनेमात तुम्ही पाहिला असेलच. होय, फॉरेनची ही भुतावळ आता डोबिंवलीतही आली आहे. आम्ही बोलतोय, ते मराठीतला पहिला ‘झॉम्बी’पट ‘झोंबिवली’बद्दल. नुकताच ‘झोंबिवली’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या पहिल्या ‘झॉम्बी’पटाची उत्सुकता सगळ्यांनाच होती. सोशल मीडियावर त्याची चर्चा होती. दीर्घकाळापासून या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा पाहण्याआधी तो कसा आहे, हे जाणून घ्यायलाचं हवं.
‘झोंबिवली’ हे नाव कोणत्या शहराशी जुळतंय, हे नव्यानं सांगायची गरज नाही. ते तुम्हाला माहित आहेच. ‘झोंबिवली’ हा झोम्बीपट घडतो तो डोंबिवलीत. आता झॉम्बी डोंबिवलीत कसे येतात, कशासाठी येतात आणि ते आल्यावर डोंबिवलीत काय काय थरार घडतो? तीच या चित्रपटाची कथा.
सुरूवात कशी होते तर, चित्रपटाचा नायक सुधीर जोशी (अमेय वाघ) त्याची पत्नी सीमा (वैदेही परशुरामी) हिच्यासोबत डोंबिवलीच्या एका अलिशान टॉवरमध्ये राहायला येतो तिथून. सुधीर हा इंजिनिअर असतो आणि एका फॅक्टरीत नोकरीला असतो. याच कंपनीच्या मालकाच्या टॉवरमध्ये सुधीर खूप मोठी स्वप्न, खूप मोठ्या अपेक्षा घेऊन त्याच्या गरोदर पत्नीसोबत दाखल होतो. पण इकडे आल्यावर सगळं फेल होतं. कारण दिसतं तसं नसतं, हे या टॉवरबद्दलही असतं. इथे दिसायला सगळं काही पॉश, ऑल वेल असतं. पण सोबत अनेक समस्याही असतात. पाण्याची भयंकर समस्या असते. सगळ्यांत मोठा प्रॉब्लेम म्हणजे, टॉवरसमोरची भलीमोठी झोपडपट्टी. जनता नगर नावाच्या या झोपडपट्टीपासून कथा सुरू होते आणि यानंतर काही वेळात या झोपडपट्टीवर, डोंबिवलीवर झॉम्बी अटॅक करतात. अपेक्षेनुसार, काही मोजकी माणसं म्हणजे सिनेमाचा नायक-नायिका, विश्वास (ललित प्रभाकर) असे काहीजण या अटॅकमधून वाचतात. पुढे काय तर, झॉम्बीपासून स्वत:ला कसं वाचवायचं, शहराला कसं वाचवायचं आणि सिनेमाच्या शेवटापर्यंत जिवंत कसं राहायचं, हे शिवधनुष्य त्यांना पेलायचं असतं. हे शिवधनुष्य ते कसं पेलतात? झॉम्बीच्या तावडीतून सगळे वाचतात का? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल.
चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा सिनेमा मराठीतला पहिला झॉम्बीपट आहे. कॉन्स्पेट काहीतरी वेगळा आहे, कथा काहीतरी वेगळी आहे आणि म्हणूनच चित्रपट पाहतानांचा अनुभव सुद्धा वेगळा आहे. दिग्दर्शक म्हणून आदित्य सरपोतदार यांनी एक वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहेच. टीम उत्तम आहे, तांत्रिक बाजूही उत्तम जमून आल्या आहेत. पण थरार आणि कॉमेडी याचा बॅलेन्स साधताना चित्रपटात काही त्रुटी नक्कीच जाणवतात. आदित्य सरपोतदार यांनी मराठीत एक नवा कॉन्सेप्ट आणलायं, पण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना थरार पोहोचवायचा होता की कॉमेडी पोहोचवायची होती? इथे कुठेतरी गल्लत जाणवते.झॉम्बी ही फॅन्टसी असली तरी, ती पाहताना अंगावर काटा येतो. झोबिंवली हा सिनेमा पाहताना अंगावर असाच काटा येणं अपेक्षित होतं. यात कुठेतरी सिनेमा कमी पडतो.
कलाकारांनी उत्तम काम केलंय. अमेय, ललित आणि वैदेही या तिघांनी जोरदार बॅटिंग केली आहे. तिघांचीही पात्र अफलातून आहेत. तिघांची धम्माल पाहताना मज्जा येते. पण तृप्ती खामकर हिचा कॉमिक टायमिंग सगळ्यांवर भारी ठरतो. सिनेमा संपल्यानंतरही तृप्ती लक्षात राहते. सिनेमाची भट्टी चांगली जमलीये. पण झॉम्बीचा अपेक्षित थरार कुठेतरी कमी पडतो, हे चित्रपट पाहिल्यानंतर सतत जाणवतं. काही ठिकाणी सिनेमा रेंगाळतो. अर्थात तरीही शेवटाकडे जाताना मराठीतील हा पहिलावहिला झोम्बीपट पाहताना मजा येते.हॉलिवूडच्या वेगवेगळ्या कलाकृतीतून झॉम्बी जगभरात पोहोचले. बॉलिवूडमध्येही झॉम्बींचा थरार दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि आता मराठीतही झॉम्बी दिसले. आदित्य सरपोतदार यांचं त्यासाठी खास कौतुक करावंच लागेल.
एकूण काय तर, एक वेगळा कन्सेप्ट, वेगळा विषय, वेगळी कथा, कलाकारांचा अभिनय आणि सोबत कॉमेडी विद थरार यासाठी हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.