सुवर्णा जैन
सुमारे १३० वर्षापूर्वीचा काळ. १८७५ ते १८८७चा काळ, ज्यावेळी रुढी आणि परंपरा यांचा प्रचंड पगडा होता. प्रस्थापित आणि प्रवाहाविरोधात जाऊन एखादी गोष्ट करायची म्हटली की तथाकथित समाजाकडून विरोध हा होणारच. तसा तो त्या काळातही व्हायचा. स्त्री शिक्षणाबाबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी व्रत हाती घेतलं त्यावेळी त्यांनाही अशाच विरोधाचा सामना करावा लागला.पारंपरिक विचारसरणी आणि पुरोगामी विचारांचा संघर्ष त्याकाळी झाला.
असाच काहीसा संघर्ष गोपाळ विनायक जोशी आणि आनंदी गोपाळ जोशी यांच्या वाट्यालाही आला. समाजाचा विरोध पत्करुन गोपाळ जोशी यांच्या पत्नी आनंदीबाई स्वतःच्या हिंमतीवर इंग्रजी शिक्षण घेतात, अमेरिकेत जातात आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनतात हे आपण वाचलं आहे. मात्र या दोघांच्या कथेवर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य पेललं ते दिग्दर्शक समीर विध्वंस आणि पटकथालेखक इरावती कर्णिक यांनी.
एका ध्येयवेड्या जोडप्याची असामान्य गोष्ट अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची कथा सुरु होते ती गोपाळ जोशी या पोस्टमास्तराच्या लग्नाच्या बोलणीपासून. १० वर्षाच्या आनंदी यांना पाहण्यासाठी गोपाळ जोशी येतात. गोपाळरावांचा स्वभाव काहीसा तऱ्हेवाईक, रोखठोक आणि ज्यांच्याशी बोलताना भीती वाटेल असा होता. लग्नाची बोलणी सुरु असतानाच आनंदीबाईना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाई यांच्या वडिलांना घातली. गोपाळराव म्हणजेच ललित प्रभाकर आणि आनंदी म्हणजेच भाग्यश्री मिलिंद यांचा विवाह होतो. यानंतर समाजाचा तीव्र विरोध असतानाही गोपाळराव आपल्या अटीवर ठाम राहत आनंदीबाई यांना शिकवतात.
यावेळी गोपाळराव आनंदीबाईंसोबत काहीसे कठोर होऊनही वागतात. मात्र आनंदीबाईंच्या शिक्षणाबाबतचा गोपाळरावांचा इरादा पक्का असतो. पुढे आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या जीवनात मूल येतं. एकदा ते आजारी पडतं. मात्र त्याच्या अंगात ताप असतो हे कुणालाही कळत नाही. वेळेत वैद्य उपचार न मिळाल्याने ते मूल दगावतं. आपल्या मुलाची ही अवस्था आनंदीबाईंना अस्वस्थ करते. आपल्या मुलाच्या वाट्याला आलेलं असं मरण दुसऱ्या कुणाच्या वाट्याला येऊ नये असा विचार आनंदीबाई करतात. त्यासाठी डॉक्टर बनण्याची इच्छा बोलून दाखवतात. त्याकाळात समाजाच्या दृष्टीने वैद्य सर्वोत्तम, डॉक्टरकडे जाणं हे पाप मानलं जायचं. अशा काळात आनंदीबाईंच्या मनात वैद्यकीय शिक्षणाबद्दलची ऊर्जा निर्माण होते. यांत आनंदीबाईंच्या दृढनिश्चयाला साथ गोपाळराव साथ देतात. दोघांनी याचा फक्त विचारच केला नाही संघर्षाचा सामना केला.
ध्येयप्राप्तीच्या विचाराने पछाडलेल्या या जोडप्याच्या वाटेत तथाकथित समाजाकडून बरेच अडथळे आणले गेले. तरीही दोघंही मागे हटले नाहीत. भारतात नाही तर अमेरिकेत जाऊन आनंदीबाईंनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. हाच प्रवास आनंदी गोपाळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ध्येयप्राप्तीसाठी या दाम्पत्याला काय काय अनंत अडचणी आणि विरोधाचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो मात्र उत्तरार्धात चित्रपटाची कथा वेग पकडते. या चित्रपटात गोपाळराव आणि आनंदी या दोन्ही व्यक्तिरेखांची मांडणी करणं हे दिग्दर्शकापुढे एक आव्हान होतं. मात्र त्यांची मांडणी, संवाद विशेषतः भाषा उत्तमरित्या सादर करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. आनंदीबाई आणि गोपाळरावांनी शिक्षणाच्या मागे खूप प्रवास केला.
अक्षरश: ते स्वप्नांच्या मागे धावले. त्यातही पती पत्नीच्या नात्यामधील भावनिक बंधही मोठ्या खूबीने दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. ज्या काळात बाई नवऱ्याच्या मागून चालायची त्या काळात ते दोघंही मित्र असल्यासारखे प्रवास करत होते. त्यांच्यातील नातेसंबंधसुद्धा रंजक आहेत. या चित्रपटात गोपाळरावांच्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा ललित प्रभाकरने प्रयत्न केला आहे. मात्र काही ठिकाणी कणखर गोपाळराव मिसिंग वाटतात. मात्र आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने बाजी मारली आहे. खंबीर, दृढनिश्चयी, प्रेमळ, आज्ञाधारक आणि ध्येयवेडी अशा आनंदीबाईंच्या छटा भाग्यश्रीने उत्तमरित्या साकारत संधीचे सोनं केले आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. चित्रपटाचं संगीत आणि गाणी श्रवणीय आहेत. खासकरुन ‘वाटा वाटा’ हे गाणं बराच काळ ओठांवर रेंगाळतं.
चित्रपटात १८व्या शतकाचा काळ दाखवणं एक मोठं आव्हान होतं. चित्रपटाचे अनेक लोकेशन्स परफेक्ट आहेत. मात्र काही ठिकाणी आणखी चांगलं झालं असत असं चित्रपट पाहताना वाटतं. असं असलं तरी तो काळ पुन्हा रुपेरी पडद्यावर अनुभवणं रसिकांसाठी पर्वणीच आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या जोडप्याने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. आजच्या युगात तर बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. तरीही काहीजण खचून जातात. इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काहीच अशक्य नसतं असा प्रेरणादायी संदेश घेऊनच रसिक चित्रपटगृहाबाहेर पडतात.