Join us

andyacha funda review : अंड्याचा फंडाः मैत्रीत गुंफलेल्या रहस्याची उकल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 11:30 AM

चित्रपटाच्या शीर्षकावरून 'अंड्याचा फंडा' हा बालचित्रपट वाटत असला, तरी त्याला मोठ्यांच्या रहस्याची जोड दिल्याने ही कथा दोन्ही पातळ्यांवरून हाताळणे या चित्रपटाला भाग पडले आहे. पण त्यामुळे तो धड बालचित्रपटही राहात नाही आणि निव्वळ थ्रिलरही होत नाही. या कैचीत अडकलेल्या या चित्रपटाने मैत्रीत गुंफलेल्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Release Date: June 30, 2017Language: मराठी
Cast: अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव, दीपा परब-चौधरी, सुशांत शेलार, अजय जाधव, किरण खोजे, अरुण नलावडे, आरती वडगबाळकर, माधवी जुवेकर
Producer: विजय शेट्टी, प्रशांत पुजारी, इंदिरा विश्वनाथ शेट्टीDirector: संतोष शेट्टी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
राज चिंचणकर   चित्रपटाच्या शीर्षकावरून 'अंड्याचा फंडा' हा बालचित्रपट वाटत असला, तरी त्याला मोठ्यांच्या रहस्याची जोड दिल्याने ही कथा दोन्ही पातळ्यांवरून हाताळणे या चित्रपटाला भाग पडले आहे. पण त्यामुळे तो धड बालचित्रपटही राहात नाही आणि निव्वळ थ्रिलरही होत नाही. या कैचीत अडकलेल्या या चित्रपटाने मैत्रीत गुंफलेल्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्गात शिकत असलेल्या अंड्या आणि फंड्या या दोन मित्रांची ही कथा आहे. अंड्या सुखवस्तू घरातला व हुशार; तर फंड्या गरीब घरातला आणि उचापत्या करणारा आहे. शाळेच्या सुट्टीत फंड्या कोकणात जातो; मात्र तो परततो तो एका वेगळ्याच रूपात! पुढे शाळेच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अंड्याला कोकणात जायची संधी मिळते; मात्र अंड्याची आई त्याला विरोध करते. परंतु, तिच्या विरोधाला न जुमानता घरच्या इतर मंडळींच्या पाठिंब्यावर अंड्या कोकणात जातो. फंड्या तर कोकणात आधीच 'हजर' असतो. तिथे त्यांना वासंती ही मैत्रीण भेटते आणि तिच्या मदतीने हे दोघे कोकणात दडलेल्या एका रहस्यापर्यंत येऊन पोहोचतात. संतोष शेट्टी यांची कथा व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची पटकथा अंबर हडप, गणेश पंडित व श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यात खर्ची पडला असून, यात कथा पुढे सरकण्याच्या अनुषंगाने फार काही घडत नाही. साहजिकच, उत्तरार्धात काही तरी घडेल असे वाटत राहते. परंतु मध्यांतरानंतर जे काही घडते त्याने कथेचा तोल ढळतो. कारण उत्तरार्धात विविध प्रसंगांचा जलद गतीने मारा होतो. मूळ कथा थोडी भरकटली असल्याचेही जाणवते. वास्तविक या चित्रपटाच्या अनुभवी पटकथाकारांना त्यावर अजून चांगले काम करता आले असते. अथर्व बेडेकर (अंड्या), शुभम परब (फंडया), मृणाल जाधव (वासंती) या बालकलाकारांसह इतर मंडळींनी अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट तोलून धरला आहे. दीपा परब-चौधरी (देवयानी) यांचे या निमित्ताने पडद्यावर झालेले पुनरागमन सुखावह आहे. सुशांत शेलार, अजय जाधव, किरण खोजे, अरुण नलावडे, आरती वडगबाळकर, माधवी जुवेकर, संदेश कुलकर्णी, समीर विजयन, अनिल नगरकर, प्रमोद पवार, रमेश वाणी आदी कलाकारांची यथायोग्य साथ चित्रपटाला मिळाली आहे. लहान मुलांची धमाल आणि रहस्य याबद्दल आकर्षण असल्यास मात्र हा चित्रपट दोन घटका मनोरंजन करू शकेल.