आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात अश्रूंची झाली फूले या नाटकातील एकदम कडक... असा एक संवाद आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट एकदम कडक आहे असेच म्हणावे लागेल. या चित्रपटात काही त्रुटी असल्या तरी सुबोध भावेच्या अभिनयापुढे या गोष्टी लक्षात राहात नाहीत.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एखाद्या चित्रपटात घडाव्यात अशा अनेक रंजक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. काशिनाथ घाणेकर या नटाचे आयुष्यच एखाद्या चित्रपटाप्रमाणे होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवावा असे वाटण्यात काहीच हरकत नव्हती. त्यांचे आयुष्यच फिल्मी असल्याने या चित्रपटाची कथा आपल्याला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी ठरते. काशिनाथ घाणेकर हे मराठीतील पहिले सुपरस्टार होते याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात याच सुपरस्टारचे आयुष्य दिग्दर्शकाने मांडले आहे.
काशिनाथ घाणेकर (सुबोध भावे) हे डॉक्टर असले तरी त्यांना अभिनयाचे प्रचंड वेड होते. अभिनय क्षेत्रात कारकिर्द करताना त्यांची पत्नी इरावती (नंदिता धुरी) देखील त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहाते. अभिनयक्षेत्रात आल्यावर या नटाच्या आयुष्यात काय काय घडते, वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात किती उलाढाली घडतात, या नटाचे आयुष्य कसे होते हे सगळे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
डॉ. काशिनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा सुबोध भावे अक्षरशः जगला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सुबोध या चित्रपटात हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसला आहे. त्याचसोबत त्याने प्रत्येक दृश्यात त्याच्या अभिनयाने एक जिवंतपणा आणला आहे. या भूमिकेसाठी सुबोधचे करावे तितके कौतुक कमीच आहे. सुबोधने काशिनाथ यांच्या नाटकातील सगळ्याच भूमिका खूपच छानप्रकारे साकारल्या आहेत. लाल्या या व्यक्तिरेखेतील संवाद तर प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जाणार यात काहीच शंका नाही. या चित्रपटात सुबोधसोबतच प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता धुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. काशिनाथ यांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करताना केवळ काहीच व्यक्तिरेखांना दिग्दर्शकाने अधिक वाव दिला आहे. त्यामुळे सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमीत राघवन यांच्या वाट्याला छोट्याशा भूमिका आल्या आहेत. पण त्यांनी त्यांची कामे चोख पार पाडली आहेत. प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसादने त्याची भूमिका अप्रतिम साकारली आहे. सुबोध आणि त्याची एकत्र असलेली दृश्यं मस्त जमून आली आहेत. नंदिता धुरी, वैदही परशुराम यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाला मध्यांतरापर्यंत चांगलाच वेग आहे. पण नंतर चित्रपट काहीसा संथ झाल्यासारखा वाटतो. चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत काही दृश्य उगाचच टाकल्यासारखी वाटतात.
या चित्रपटाचा काळ हा साठ आणि सत्तरच्या दशकातील आहे. पण हा काळ उभा करण्यात दिग्दर्शकाला यश आलेले नाही असेच म्हणावे लागेल. कारण दिग्दर्शकाने रिअल लोकेशन्स न वापरता चित्रीकरण एखाद्या स्टुडिओत केले आहे हे लगेचच लक्षात येते. तसेच चित्रपटात त्याच त्याच लोकेशन्सचा अनेकवेळा वापर करण्यात आला आहे. कलाकारांची केशभूषा, वेशभूषा देखील त्या काळाशी तितकीशी साजेशी नाहीये. चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या व्यवसायिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी तुटक दाखवल्यासारख्या वाटतात. तसेच डॉ.श्रीराम लागू आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यात असलेली स्पर्धा केवळ काहीच दृश्यांद्वारे दाखवण्यात आलेली आहे. या गोष्टींना अधिक वाव देणे गरजेचे होते. श्रीराम लागू यांच्या नाटकाला मुद्दामहून काशिनाथ घाणेकर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसतात. तसेच काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाला डॉ. लागू प्रेक्षकांमध्ये जाऊन बसतात ही दृश्यं मस्त जमून आली आहेत. तसेच काशिनाथ घाणेकर रायगडाला जाग येते या नाटकासाठी ऑडिशन देतात, अश्रूंची झाली फूले या नाटकातील त्यांच्या व्यक्तिरेखेला नंतरच्या काळात रसिकांचा प्रतिसाद मिळेनासा होतो... त्यावेळी झालेली त्यांची अवस्था ही दृश्य दिग्दर्शकाने खूप चांगल्याप्रकारे दाखवली आहेत. तसेच चित्रपटाचे संवाद खूपच छान आहेत. एकंदरीतच हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतो यात काहीच शंका नाही.