Join us

Avengers Endgame English Movie Review : काळीज पिळवटून टाकणारा शेवट

By सुवर्णा जैन | Published: April 26, 2019 12:33 PM

सुपरहिरोजची एक वेगळी लोकप्रियता आहे. या सुपरहिरोंचे कारनामे आणि अद्भुत-अनोख्या शक्तींनी जगाला वारंवार वाचवल्याचं आपण वाचलंय, ऐकलंय आणि पाहिलंय.

Release Date: April 26, 2019Language: इंग्रजी
Cast: रॉबर्ट डाउनी, ख्रिस इव्हान्स, ख्रिस हैम्सवर्थ, मार्क रफेलो, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड
Producer: Director: अँथोनी रूसो, जो रूसो
Duration: 3 तास 13 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

सुर्वणा जैन 

सुपरहिरोजची एक वेगळी लोकप्रियता आहे. या सुपरहिरोंचे कारनामे आणि अद्भुत-अनोख्या शक्तींनी जगाला वारंवार वाचवल्याचं आपण वाचलंय, ऐकलंय आणि पाहिलंय. त्यामुळं भारतासारख्या देशातही या अ‍ॅव्हेन्जर्सचा बोलबाला पाहायला मिळाला. कारण रसिक त्यांना, त्यांच्या अजब तसंच अद्भुत शक्तींना स्वतःशी काहीतरी नातं आहे असं समजतात. त्यामुळे सुपरहिरोशी संबंधित कुठल्याही चित्रपटाला किंवा कलाकृतीला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. जगातून वाईटाचं उच्चाटन करण्यासाठी किंवा चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्यासाठी जगात पुन्हा सुपरहिरोंची फौज परतली आहे. वाईटाचा अंत कसा होतो हे दाखवणारा अ‍ॅव्हेन्जर्स एंडगेम हा चित्रपट एकप्रकारे याआधीच्या २१ चित्रपटाचा शेवट आहे. यांत २१ चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखेला स्थान देण्यात आलं आहे. इन्फिनिटीवॉरमध्ये थेनॉसविरुद्धच्या युद्धात हरलेला आयर्नमॅन कॅप्टन मार्व्हलच्या मदतीने अखेर पृथ्वीवर परततो. यामुळे उत्साहित झालेले कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सात सुपरहिरो थेनॉसवर हल्ला करतात.थेनॉसने इन्फिनीटी स्टोन नष्ट केल्यामुळे हा हल्ला निष्फळ ठरतो. सुपरहिरो थॉर स्ट्रॉम ब्रेकरच्या मदतीने केलेल्या हल्ल्यातही थेनॉसच वरचढ ठरतो. आकाशगंगेतील नष्ट झालेली निम्मी सजीवसृष्टी पुर्नजिवित कशी करणार हा सगळ्या मोठा प्रश्न अ‍ॅव्हेंजर्सपुढे असतो. अ‍ॅव्हेंजर्स पाच वर्षे याचं उत्तर शोधत असतात. अनेक वर्षांपासून क्वॉन्टम रेलममध्ये फसलेला अँटमॅन अचानक बाहेर येतो. त्याच्याच मदतीने अ‍ॅव्हेंजर्स भूतकाळात जाऊन सर्व इन्फिनीटी स्टोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान घडणाऱ्या गमतीजमतीमुळे रसिक वेळोवेळी हसतात, ओरडतात तर कधी रडतात. क्लायमेक्समध्ये सगळे सुपरहिरोज एकत्र येऊन थेनॉसविरूद्ध युद्ध पुकारतात. थेनॉसविरुद्धच्या या युद्धात अनेक विस्मयकारी घटना घडतात. मात्र युद्धाची किंमत कुणाला तरी चुकवावीच लागते. त्यात ते युद्ध वाईट प्रवृत्तीविरोधात असेल तर ते युद्ध नक्कीच सोपं नसतं. परिणामी सुपरहिरोंच्या फौजेतील दोन लाडक्या सुपरहिरोंना थेनॉसविरुद्धच्या या युद्धात आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागतं. अनेक चढउतार, गमतीजमती, आरडाओरडा या दरम्यान घडणारा हा शेवट काळीज पिळवटून टाकणारा ठरतो. 

भावना आणि अ‍ॅक्शन ही अ‍ॅव्हेंजर्सची ताकद राहिली आहे. त्यामुळे ‘अँथोनी रूसो’ व ‘जो रूसो’ या दोन बंधू दिग्दर्शकांनी रसिकांची नस ओळखत इमोशन्स आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त डोस दिला आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरून एका युगाचा अंत झाल्याचे स्पष्ट होत आहे. चित्रपटाची सुरूवात काहीशी संथ होते. मात्र इन्फिनीटी वॉरनंतर सुपरहिरोज आपले कारनामे आणि शक्तीद्वारे कशाप्रकारे स्वतःला प्रस्थापित करतात हे दोन्ही दिग्दर्शकांना दाखवायचे होते. अँटमॅनची एंट्री होते आणि त्यानंतर आपल्या जवळच्यांना परत आणण्याचा उत्साह तो अॅन्हेन्जर्समध्ये निर्माण करतो. यानंतर चित्रपटाची कथा वेग पकडते. मार्व्हलने तयार केलेला आजवरचा सर्वात लांबलचक चित्रपट आहे. तब्बल ३ तास १३ मिनिटांच्या या चित्रपटात दोन मध्यांतर येतात. मात्र भूतकाळ आणि वर्तमानाचा संदर्भ देत अनेक चढउतारांसह चित्रपटाची कथा तुम्हाला श्वास रोखून धरण्यास भाग पाडते. चित्रपटाचं एडिटिंग शार्प आणि अचूक आहे. चित्रपटाचे संवाद तुम्हाला हसवतात. चित्रपटाला बांधण्यासाठी अनेक लहान लहान फ्लॅशबॅक आहेत. त्यामुळे कथेबाबतची उत्कंठा रसिकांना खिळवूनच ठेवते. क्लायमॅक्समध्ये युद्धाच्या वेळी वापरलेले स्पेशल इफेक्ट्स अक्षरशा डोळे दिपवणारे ठरतात. मात्र थ्रीडी अ‍ॅनिमेशन, लाइिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी यामुळे चित्रपट वेगळ्या उंचीवर पोहोचतो. या सगळ्यात प्रत्येक कलाकाराच्या भूमिकाही लक्षवेधी आहे. आयरन मैन (रॉबर्ट डाउनी) कॅप्टन अमेरिका (ख्रिस इव्हान्स), थॉर (ख्रिस हैम्सवर्थ), हल्क (मार्क रफेलो) , स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, अँट मॅन (पॉल रड) हे सगळे आपल्या चीरपरिचित सुपरहिरोच्या प्रतिमेतच झळकलेत. मात्र थॉरला (ख्रिस हॅम्सवर्थ) सुपरहिरोऐवजी दारुड्याच्या रुपात पाहून रसिकांना वेदना होता. तर थेरॉन्स नेहमीप्रमाणे लार्जर दॅन लाइफ म्हणजेच भव्यदिव्य स्वरुपात दिसतो. त्याच्या लेकी मात्र वेगवेगळ्या रुपात दिसल्या आहेत. मात्र चित्रपटाचा शेवट रसिकांचं मन हेलावून टाकणारा ठरतो. ती सल घेऊनच रसिक चित्रपटगृहाबाहेर पडतो. एकूणच काय तर हा चित्रपट भव्यदिव्य करत रसिकांच्या काळजाला हात घालण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शकांनी यशस्वीरित्या पेललं आहे. त्यामुळे हा चित्रपट अ‍ॅव्हेन्जर्सप्रेमींसाठी मस्ट वॉच असाच आहे.

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेम