Join us

baban marathi movie review : मनाला न भावणारा बबन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:53 AM

गावात राहाणाऱ्या एका सर्वसामान्य मुलाची कथा बबन या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

Release Date: March 22, 2018Language: मराठी
Cast: भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
Producer: विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड , भाऊसाहेब शिंदेDirector: भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
Duration: २ तास २२ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीस ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनीच बबन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ख्वाडा हा त्यांचा चित्रपट एका वेगळ्या बाजाचा चित्रपट होता. त्याचप्रकारे बबन देखील वेगळ्याच पठडीतील चित्रपट असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गावात राहाणाऱ्या एका सर्वसामान्य मुलाची कथा बबन या चित्रपटात मांडण्यात आली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने आपण एखादा व्यवसाय करून घराला हातभार लावावा, आपल्या कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढावे असे प्रत्येक मुलाला वाटत असते. गावातील सर्वसामान्य मुलांचे प्रतिनिधित्व करणारा हा बबन आहे. बबनचे वडील (भाऊराव कऱ्हाडे) सतत दारू पित असतात. त्यांनी दारुच्या आहारी जाऊन अनेक एकर जमीन विकलेली असते. शेतजमीन नसली तरी घरात काही गुरे-ढोरे असतात. त्यामुळे बबन कॉलेज सांभाळून दुधाचा व्यवसाय करत असतो. पण त्याला म्हणावा तितका नफा मिळत नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी तो दूध थेट कंपनीत जाऊन विकायला सुरुवात करतो. पण बबनने थेट दूध विकायला सुरुवात केल्याचे अभ्या (अभय चव्हाण)ला पटत नाही. त्याचा नफा जात असल्याने तो त्याला अनेकवेळा मारहाण करतो. अभ्या आणि बबन हे कॉलेजमध्ये देखील एकत्र असतात आणि त्या दोघांनाही कोमल (गायत्री जाधव) आवडत असते. पण कोमलचे बबनवर प्रेम असते. यामुळे देखील अभ्या आणि बबनमध्ये वारंवार भांडणं होत असतात. बबनने आर्थिक प्रगती करावी हे अभ्याला आवडत नसल्याने तो सतत त्याला त्रास देत असतो. या सगळ्यातून बबन मार्ग काढतो का? बबन आणि कोमलच्या प्रेमकथेचे काय होते याची उत्तरे प्रेक्षकांना बबन या चित्रपटात मिळतात. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याने बबन या चित्रपटाकडून चांगल्याच अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांवर बबन तितकासा उतरत नाही. चित्रपटात मध्यांतरापर्यंत विशेष असे काहीच घडत नाही. चित्रपटाचा वेग अतिशय संथ असल्याने चित्रपट पाहाताना कंटाळा येतो. चित्रपटातील गाणी चांगली असली तरी चित्रपटात ती उगीचच टाकली असल्याचे वाटते. पण चित्रपटाचे बँकराऊंड म्युझिक आणि सिनेमेटोग्राफी चांगली आहे. चित्रीकरण करण्यासाठी दिग्दर्शकाने खूपच चांगला परिसर निवडला आहे. पण चित्रपटाच्या कथेत तितकासा दम नाहीये.चित्रपटात भाऊराव कऱ्हाडे यांनी बबनच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका मस्त जमून आली आहे. तसेच हा गायत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिने चांगले काम केले आहे. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यासाठी तिला दाद देणे गरजेचेच आहे. भाऊसाहेब शिंदे याने बबन तर सुरेखा डिंगले यांनी बबनच्या आईची भूमिका चांगली वठवली आहे. सुरेखा यांनी खूप कमी संवाद असले तरी त्यांनी त्यांच्या डोळ्यातून, देहबोलीतून चांगला अभिनय केला आहे.  चित्रपटाच्या शेवटच्या दहा मिनिटांत दिग्दर्शकाने खरी आपली कसब दाखवली आहे. चित्रपटाचा शेवट नक्कीच अंगावर येतो. पण एकंदर विचार केला तर हा चित्रपट आपली निराशा करतो.