Join us

भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review 

By देवेंद्र जाधव | Published: July 19, 2024 9:57 AM

विकी कौशल-तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' थिएटरमध्ये बघायचा प्लॅन करताय? त्याआधी वाचा review (Bad Newz)

Release Date: July 19, 2024Language: हिंदी
Cast: विकी कौशल, तृप्ती डिमरी, ॲमी वर्क, शिबा चढ्ढा आणि इतर
Producer: करण जोहरDirector: आनंद तिवारी
Duration: २ तास २२ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

'ॲनिमल'नंतर काहीच दिवसांनी तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' या नवीन सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. त्यामुळे उत्सुकता वाढली. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'बॅड न्यूज'मधील 'तौबा तौबा' गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखी शिगेला. पण 'बॅड न्यूज' पाहून घोर निराशा झाली. ना धड कॉमेडी, ना धड रोमान्स, ना धड इमोशन्स. नेमकं काय दाखवायचं याच 'कन्फ्युजन' झाल्याने सिनेमा पूर्ण भरकटला गेलाय. त्यामुळे 'बॅड न्यूज' पाहून 'बॅड मुड'ने थिएटरबाहेर पडावं लागतं. 

कथानक:तुम्ही 'बॅड न्यूज'चा ट्रेलर पाहिला असल्यास तुम्हाला कथेचा अंदाज आला असेल. तरी कथेवर प्रकाश टाकायचा झाला तर, अखिल चढ्ढा (विकी कौशल) आणि सलोनी (तृप्ती डिमरी) या दोघांची भेट एका घरगुती कार्यक्रमात होते. पाहताक्षणी एकमेकांकडे दोघे आकर्षित होतात. पुढे दोघांमध्ये मैत्री होते, प्रेम जुळतं आणि दोघांचं लग्न होतं. परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसांत काही कारणाने दोघांचा घटस्फोट होतो. पुढे सलोनी मसुरीला निघून जाते. तिथे तिची ओळख गुलाबीरसोबत (ॲमी वर्क) होते. नंतर गोष्टी अशा घडतात की, सलोनीची एकाच रात्री गुरबीर आणि अखिलसोबत 'गडबड' होऊन ती गरोदर होते. टेस्ट केल्यावर होणाऱ्या बाळाचा नेमका बाप कोण? अखिल की गुरबीर? असा प्रश्न सलोनीसमोर उभा राहतो. मग पुढे कथानकात ट्विस्ट अँड टर्न येतात. आपल्या मनात बांधलेले अंदाज खरे ठरतात. सरतेशेवटी एक 'हॅपी एंडिंग' होऊन 'बॅड न्यूज' संपतो. 

दिग्दर्शन: आनंद तिवारी या व्यक्तीने 'बॅड न्यूज' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. आनंद हा तोच व्यक्ती आहे ज्याने 'बंदिश बँडीट्स' सारख्या सुंदर म्युझिकल वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं. याशिवाय 'गो गोवा गॉन' आणि आणि विविध जाहिरातींमधून आपण त्याला अभिनय करताना पाहिलंय. आनंदने मुळात बॉलिवूडमध्ये असा विषय निवडणं हाच मोठा अपेक्षाभंग आहे. दिग्दर्शनात सुद्धा आनंद एवढी कमाल दाखवू शकला नाही. एकसुरी पद्धतीने सिनेमा पुढे सरकतो. बॅकग्राऊंड म्युझिकमधून कॉमेडी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतो. सिनेमातले विनोद ट्रेलरमध्ये आधीच बघितल्याचे विशेष काही नावीन्य राहत नाही. गाणी आणि त्याची कोरिओग्राफी मात्र मस्त जमली आहे. हीच सिनेमातली सुखावह गोष्ट. बाकी सर्व आनंदीआनंदच आहे! 

अभिनय:संपूर्ण सिनेमा आपण शेवटपर्यंत पाहतो तो म्हणजे विकी कौशलमुळे. अखिलची साधीसरळ भूमिका विकीने मोठ्या ताकदीने साकारली आहे. विकीने या भूमिकेसाठी स्वतः केलेला अभ्यास आणि तयारी जाणवते. सहज प्रसंगात विकी असं काही करतो त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. 'ॲनिमल'मध्ये छोट्या भूमिकेतून भाव खाऊन गेलेली तृप्ती इथे मात्र 'शोभेची बाहुली' म्हणून दिसलीय. तिने अभिनय समरसून केलाय. तिचा कॉमिक टायमिंगही चांगला आहे. पण 'कला', 'बुलबुल'सारखे सिनेमे करणारी तृप्ती आणखी चांगल्या आणि आशयघन भूमिकांमध्ये दिसेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. गुलबीरच्या भूमिकेत ॲमी वर्कने त्याचं काम प्रामाणिकपणे निभावलं आहे. पण तरीही त्याच्याजागी आणखी एखादा प्रभावी अभिनेता असायला हवा होता. कारण विकी - ॲमीचे एकत्रित सीन असताना विकी अभिनयात ॲमीला पूर्ण खाऊन टाकतो. त्यामुळे कॉमेडीची हवीतशी जुगलबंदी रंगत नाही. 

अशाप्रकारे बैल इवलासा चारा जसा रवंथ करत खातो तसं 'बॅड न्यूज'चं झालंय. छोटीशी कथा इतकी ताणली आहे की, शेवटी कंटाळा येतो. तुलनेचा विषय नाही पण एकीकडे साऊथमध्ये 'मंजुमल बॉइज', 'आवेशम', 'महाराजा' सारखे एकापेक्षा एक भन्नाट विषयांचे सिनेमे पाहायला मिळत आहेत. पण दुसरीकडे बॉलिवूड अजूनही 'बॅड न्यूज' सारख्या टिपिकल कथेत अडकून पडलाय. बॉलिवूडने स्वतःला 'मुव्ह ऑन' करण्याची गरज आहे.

टॅग्स :विकी कौशलतृप्ती डिमरीकरण जोहर