जान्हवी सामंत
'बधाई हो' चित्रपटाला एक मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट सध्या आजूबाजूला घडण्याऱ्या गोष्टी योगा-योगाने कशा जुळून येतात आणि त्यातून काय काय घडत जाते ह्यावर विनोदी अंगाने भाष्य करतो. थोडक्यात काय तर अडीच तास हा चित्रपट तुम्हाला प्रचंड हासवतो व थोडासा रडवतोसुद्धा.
चित्रपटाची कथा नकुल (आयुषमान खुराणा) नावाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची आहे, लोधी कॉलनीमध्ये राहणारे कौशिक कुटुंब आपल्या छोट्या जगात खुश असतात. नकुलचे वडिल जितेंद्र (गजराज राव) रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करत असतात. त्यांची पत्नी प्रियंवदा (नीना गुप्ता) एक गृहिणी आहे असते त्याचबरोबर ती सून, नकुल व गुलारची आई या सगळ्या जबाबदऱ्या समर्थपणे संभाळत असते. चित्रपटाला खरी सुरवात होते जेव्हा सासू-सासरे होण्याचे स्वप्न पाहणारे जितेंद्र आणि प्रियंवदाला कळते की ते पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. प्रियंवदा या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेते आणि तिथून पुढे सगळ्या गमती-जमती घडायला सुरुवात होतात. नकुल आणि गुलार आई-वडिलांच्या या निर्णयाला विरोध करतात. सासू (सुरेखा सिकरी), नातेवाईक आणि शेजारी सगळ्यांमध्ये चर्चाच विषय बनतो. या सगळ्यांचा सामना करताना जितेंद्र आणि प्रियंवदाची होणारी तारांबळ बघण्यासारखी आहे.
दिग्दर्शक अमित शर्माने या चित्रपटातून एक चांगला मुद्दा मांडला आहे जो आजच्या मॉर्डन भारतातील मध्यम वर्गीय कुटुंबात घडतो. 'लोक काय म्हणतील ?' या विचाराने अनेक गोष्टी करण्याचे धाडसच केले जात नाही. याच विचारसरणीवर एका चांगला कटाक्ष दिग्दर्शकाने चित्रपटात टाकला आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन तुम्हाला हसवत ठेवेल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. तर चित्रपटाच्या दुसऱ्या भाग पाहताना तुम्ही काहीसे भावनिकदेखील व्हाल. चित्रपटातील प्रत्येक पात्रने आपला अभिनय उत्कृष्ट पद्धतीने केला आहे, गजराज रावने उभा केलेला कधी कवी, कधी प्रेमळ असा पती लक्षात राहण्यासारखा आहे. विशेषकरून सुरेखा सिकरीचा अभिनय वखाण्याजोग आहे. थोडक्यात काय... प्रत्येकाने आवर्जून पाहावा असाच आहे 'बधाई हो' चित्रपट.