Join us

Badla Movie Review : सस्पेन्सचा चक्रव्युह

By तेजल गावडे | Published: March 08, 2019 3:42 PM

सुजॉय घोष यांनी 'कहानी', त्याचा सीक्वल 'कहानी २' व 'तीन' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानंतर ते 'बदला' हा मर्डर मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

Release Date: March 08, 2019Language: हिंदी
Cast: अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, अमृता सिंग, प्रकाश राज, टोनी ल्यूक, मानव कौल व तनवीर घानी
Producer: गौरी खान, गौरव वर्मा, सुनीर खेतेरपाल, अक्षय पुरीDirector: सुजॉय घोष
Duration: २ तासGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

'बदला' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामागे दोन कारणं आहेत. त्यातील एक म्हणजे 'पिंक' चित्रपटानंतर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू ही जोडी पुन्हा एकदा 'बदला' चित्रपटात पाहायला मिळणार आणि दुसरे कारण म्हणजे दिग्दर्शक सुजॉय घोष. सुजॉय घोष यांनी 'कहानी', त्याचा सीक्वल 'कहानी २' व 'तीन' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानंतर ते 'बदला' हा मर्डर मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. 

'बदला' चित्रपटाची कथा नैना सेठी (तापसी पन्नू) या महिलेवर गुंफण्यात आली आहे. नैना विवाहित असताना देखील तिचे अर्जुन जोसेफ (टोनी ल्युक)सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असते. त्याचा खून केल्याचा आरोप नैनावर असतो आणि नैना विरोधात सर्व काही पुरावे असतात. नैना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी प्रसिद्ध वकील बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) यांची निवड करते. गेल्या चाळीस वर्षात एकही केस ते हरलेले नसतात. त्यामुळे नैनाच्या विरोधात ठोस पुरावे असतानादेखील ते या प्रकरणातून तिला दोषमुक्त करण्यात यशस्वी ठरतात की नाही, या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहिल्यानंतर मिळेल.

'बदला' चित्रपट स्पॅनिश चित्रपट 'द इन्विजिबल गेस्ट'चा रिमेक आहे. संपूर्ण चित्रपटात बहुतांश भागात एका गुन्ह्याला घेऊन आरोपीचा वकील व आरोपी यांच्यामध्ये या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी चाललेला वादविवाद रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन व तापसी पन्नू या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यात एक घर... त्या घरात वकील व आरोपी यांच्यातील संभाषण जास्त रेखाटण्यात आले आहे. तरीदेखील हा चित्रपट पाहताना कुठेही अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शक व अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांना जाते. दिग्दर्शक सुजॉय घोष 'कहानी'सारख्या चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना सस्पेन्समध्ये गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध जसजसा पुढे सरकतो तसतशी उत्कंठा आणखीन वाढत जाते. दोन व्यक्तींमधील जास्त संवाद व कमी दृश्ये असतानादेखील प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची किमया पटकथाकाराने उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन व तापसी पन्नू यांच्याव्यतिरिक्त अमृता सिंग, प्रकाश राज,टोनी ल्यूक, मानव कौल व तनवीर घानी या कलाकारांनीदेखील खूप चांगला अभिनय केला आहे. या सस्पेन्सच्या चक्रव्युहात नक्कीच अडकून पहा.

टॅग्स :बदलाअमिताभ बच्चनतापसी पन्नूअमृता सिंग