- तेजल गावडे
आयुषमान खुराणाने आतापर्यंत 'शुभ मंगल सावधान', 'बरेली की बर्फी', 'अंधाधुन', 'बधाई हो' आणि 'आर्टिकल १५' यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यानंतर आता त्याचा आणखीन एक हटके चित्रपट 'बाला' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.
चित्रपटाची सुरुवात होते बाला मुकुंद शुक्ला उर्फ बालाच्या शालेय जीवनापासून. त्याला आपल्या केसांवर आणि लुक्सवर खूप गर्व असतो. तो शाहरुख खानचा खूप मोठा फॅन असतो आणि त्याचे डायलॉग्ज मारत शाळेतील मुलींना इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची मैत्रीण लतिका (भूमी पेडणेकर)चा रंग काळा असल्यामुळे त्याला ती आवडत नसते. तर लतिकाच्या मनात बालाबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. मात्र त्या दोघांचे अजिबात पटत नसते. मोठे झाल्यावर देखील त्यांचे नाते तसेच राहते. बाला फेअरनेस क्रीम कंपनीत कामाला असतो तर लतिका वकील बनते. मात्र बालाच्या जीवनात खूप मोठा बदल होतो. केसांवर प्रेम असणाऱ्या बालाचे दिवसेंदिवस केस गळू लागतात आणि तो त्रस्त होतो. केस गळण्यासोबत त्याचा कॉन्फिडन्स देखील कमी होत जातो. केस पुन्हा उगवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो. अखेर त्याचे वडील (सौरभ शुक्ला) त्याच्यासाठी विग घेऊन येतात. या विगमुळं त्याचे आयुष्य नव्याने सुरू होते. त्याच्या क्रीम कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर व टिक टॉक स्टार परी (यामी गौतम) हिच्यावर त्याचं क्रश असतं. दरम्यान एक दिवस कामाच्या निमित्ताने त्यांची भेट होते. त्यांनंतर त्यांच्यात प्रेम होते आणि ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. परंतु, परीला बालाला टक्कल असल्याचे माहीत नसते. बालाच्या या समस्येबद्दल परीला समजेल तेव्हा काय होईल की बाला स्वतःला स्वीकारेल हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.
दिग्दर्शक अमर कौशिकने टक्कल पडणे व रंगभेदाचा मुद्दा खूप उत्तमरीत्या रुपेरी पडद्यावर रेखाटला आहे. या मुद्द्याच्या मूळ प्रश्नाला हात घालत दिग्दर्शकाने हा विषय मजेशीर पद्धतीने सादर केला आहे. पूर्वार्ध काही ठिकाणी संथ वाटतो. मात्र उत्तरार्धात चित्रपट आणखीन रंजक होत जातो. लेखक नीरेन भट यांचे 'हेअर लॉस नहीं आयडेंटिटी लॉस हो रहा है हमारा' आणि 'हम तो एकता कपूर का सीरियल हैं, जो बस चलता ही रहेगा...' यांसारखे वन लाइनर डायलॉग हसायला भाग पाडतात. सिनेमॅटोग्राफर अनुज राकेश धवनने कानपूर शहर आपल्या कॅमेऱ्यात छान कैद केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या संकलकानेदेखील आपली जबाबदारी चोख बजावली आहे. चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग असल्यामुळे तशी गाण्यांची आवश्यकता नव्हती. मात्र चित्रपटाच्या शेवटी सादर झालेलं गाणं 'डोन्ट बी शाय' पाहण्यासारखे आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटात अकाली टक्कल पडलेला तरुण आणि काळ्या रंगाच्या तरुणीची स्टोरी भलेही वेगळी असली तरी ती एकमेकांसोबत चांगल्यारितीने कनेक्ट करण्यात आली आहे.