Join us

Batti Gul Meter Chalu Movie Review : सुखद धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 4:20 PM

ट्रेलर पाहून हा चित्रपट वीज चोरी आणि वीज बचतीसारख्या सामाजिक मुद्याला वाहिलेला असावा, असेच सगळ्यांना वाटले. पण प्रत्यक्षात ‘बत्ती गुल मीटर चालू’ यापलीकडे जात एक सुखद धक्का देतो.उपदेशांचा भडीमार असूनही हा चित्रपट अनपेक्षितपणे मनोरंजन करतो.

Release Date: September 21, 2017Language: हिंदी
Cast: शाहिद कपूर, श्रद्धा कपूर, यामी गौतम, दिव्येन्द्रू शर्मा, एना एडोर
Producer: भूषण कुमार Director: श्री नारायण सिंह
Duration: २ तास ४३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- जान्हवी सामंत

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटापाठोपाठ त्याच दिर्ग्शकाचा दुसरा चित्रपट ‘बत्ती गुल मीटर चालू’चा ट्रेलर पाहून हा चित्रपट वीज चोरी आणि वीज बचतीसारख्या सामाजिक मुद्याला वाहिलेला असावा, असेच सगळ्यांना वाटले. पण प्रत्यक्षात ‘बत्ती गुल मीटर चालू’ यापलीकडे जात एक सुखद धक्का देतो. उपदेशांचा भडीमार असूनही हा चित्रपट अनपेक्षितपणे मनोरंजन करतो.चित्रपटाची कथा अगदी सरळसाधी. उत्तराखंडातील टेहरी या कायम ‘बत्ती गुल’ राहणा-या गावात एसके सुशील कुमार पंत (शाहिद कपूर), एसएमटी सुंदर मोहन त्रिपाठी (दिव्येन्द्रू) आणि ‘नॉटी’ ललीता नौटीयाल (श्रद्धा कपूर)हे बालपणीचे एकमेकांसाठी अगदी जीव द्यायलाही तयार असणारे जिगरी मित्र. नॉटी ही एक फॅशन डिझाईनर असते, एसके हा एक चाणाक्ष वकील असतो तर एसएमटीचे एक प्रींटींग फॅक्टरी सुरु करण्याचे स्वप्न असते.  गमतीगमतीत नॉटीसोबत लग्न करण्याच्या धमक्या देत, मज्जा-मस्करी करत या तिघांचाही वेळ जात असतो. याचदरम्यान एसएमटीला फॅक्टरीचा परवाना मिळतो आणि लोन काढून तो आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. पण पहिल्याच महिन्यात वीजेचे अवाढव्य बील पाहून त्याचे डोळे पांढरे होतात. त्यातत सतत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने जनरेटरचा खर्चही असतो. वीज मंडळात तक्रार करूनही त्याची ही समस्या सुटत नाही. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड असेल असे समजून एसएमटी चेकिंग मीटर लावून घेतो. पण त्या महिन्यातही त्याला ५४ लाखांचे बील येते. एसएमटी यावर तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न करतो. पण त्याचे सर्व प्रयत्न फसतात. याचकाळात एसकेसोबत त्याचे भांडण होते. परिणामी एसके एसएमटीला मदत करण्यास नकार देतो. सतत सत्याच्या मार्गाने चालणारा एसएमटी यामुळे कमालीचा हताश होतो आणि वीजेचे बिल चुकवण्यासाठी पूर्वजांचे घर विकावे लागेल या भीतीने आयुष्य संपवतो. या घटनेने अख्खे टेहरी गाव हादरते.  मित्राला अडचणीच्या काळात मदत केली नाही म्हणून एसकेचे मनही अपराधीपणाच्या भावनेने भरून येते आणि तो एसपीटीएल या वीज कंपनीवर केस ठोकतो. एसएमटीची केस वृत्तपत्रातून गाजते आणि एसकेकडे वीज मंडळाच्या मनमानीविरोधात उत्तराखंडातील हजारो तक्रारींचा पाऊस पडतो. वीजेचा प्रश्न अतिशय गंभीर आणि मोठा आहे, हे एसके व नॉटीला त्यामुळे कळून चुकते. एसपीटीएलच्या मनमानीला एसके आणि नॉटी कसा चाप लावतात, कुठले डावपेच लावून ही केस जिंकतात, हीच या चित्रपटाची कथा आहे.टेहरीसारख्या गावातील छोट्या-मोठ्या गरजा, तिथली जीवनशैली, तिथे वसलेल्या लोकांचे आपआपसातील प्रेम, तीन मित्रांची मैत्री हे सगळे दिग्दर्शकाने अतिशय बारकाईने चित्रपटात रेखाटले आहे. त्यामुळेच चित्रपटाचा पहिला भाग कसा संपतो, हेही कळत नाही. सुधीर पांडे, सुप्रीया पिळगावकर, अतुल श्रीवास्तव या तिघांनी या तीन तरूणांच्या पालकांची भूमिका साकारली आहे. या भूमिका विनोदी तितक्यात वास्तववादी असल्याने मनाला भिडतात. एसके, सुंदर आणि नॉटीची केमिस्ट्रीही चित्रपटात जीव ओतते. न्यायाधीशाच्या भूमिकेत  सुष्मिता मुखर्जीही भाव खावून जाते. चित्रपटाचे संवादही मनोरंजन करतात़. पण  शाहिदचा अभिनय सगळ्यांवर भारी पडतो. चित्रपट पाहिल्यानंतर शाहिदने या चित्रपटाला ‘चार चांद’ लावलेत, असे म्हणणे वावगे होणार नाही. या चित्रपटात शाहिदचा अंदाज आणि त्याचा अभिनय एकदम वेगळा आहे. दुस-या भागाची सुरूवातही मनोरंजक होते. मात्र शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपटाची कथा काही वेडीवाकडी वळणं घेते. शाहीदच्या भाषणबाजीचाही अतिरेक होतो. त्याक्षणाला या चित्रपटाचे नाव ‘बत्ती गुल मीटर चालू’पेक्षा ‘जॉली एलएलबी3’ असायला हवे होते, असा एक विचारही मनात येतो. शेवटचा हा अर्धा तास सोडला तर ‘बत्ती गुल मीटर चालू’ निखळ मनोरंजन करतो. त्यामुळेच एकदा तरी नक्कीच बघावा. 

टॅग्स :बत्ती गुल मीटर चालूशाहिद कपूरश्रद्धा कपूर