प्राजक्ता चिटणीसमुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी दिली जावी, त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायला प्रोत्साहन द्यावे या आशयावर आजवर अनेक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. बेधडकमध्ये देखील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या एका मुलाची कथा दाखवण्यात आलेली आहे. आजवर या विषयावरचे अनेक चित्रपट बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना पाहायला मिळाले असल्याने या चित्रपटाच्या कथेत काहीच नावीण्य नाहीये.अजय (गिरीश टावरे) हा अभ्यासात हुशार नसतो. त्याचा कल हा खेळाकडे असतो. पण त्याचे वडील (गणेश यादव) एका मोठाल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असतात. त्याच कॉलेजमध्ये अजय शिकत असतो तर त्यांचा मोठा मुलगा रोहित (सुश्रुत मंकणी) अमेरिकेत नोकरी करत असतो. आपल्या मोठ्या मुलाप्रमाणेच अजयने शिकावे आणि चांगली नोकरी करावी असे त्यांना वाटत असते. पण तो कॉलेजमध्ये सगळ्या खेळांमध्ये रस घेत असतो. खेळात करियर करण्यासाठी त्याला त्याचे सर रमाकांत देसाई (अशोक समर्थ) त्याला प्रोत्साहन देत असतात. पण ही गोष्ट त्याच्या वडिलांना आवडत नाही आणि त्यातून रमाकांत देसाईंसोबत त्यांचे वाद होतात आणि रमाकांत देसाई कॉलेज सोडून निघून जातात. अजय देखील मनाविरुद्ध अभ्यासात मन रमवतो. पण काही वर्षांनी पुन्हा एकदा रमाकांत देसाई आणि अजयची भेट होते आणि बॉक्सिंग या क्षेत्रातच करियर करायचे असे तो ठरवतो. त्याला या क्षेत्रात करियर करण्यास यश मिळते का? त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे आपल्याला बेधडक चित्रपटात पाहायला मिळते.बॉक्सिंगशी निगडित आजवर आपण अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण त्यांच्या तुलनेत बेधडक हा चित्रपट आपली निराशा करतो. या चित्रपटातील बॉक्सिंग किंवा त्यावर घेतले गेलेली मेहनत आपल्याला तितकीशी खरी वाटत नाही. अजय बॉक्सिंग करण्यासाठी सराव करतो असे दाखवताना तर अनेकवेळा तीच तीच दृश्य वापरण्यात आली आहेत. गिरीश आणि त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली नम्रता गायकवाड हे कॉलेजमध्ये बारावीत असल्याचे दाखवण्यात आले आहेत. पण ते दोघेही कॉलेजकुमार वाटत नाहीत. गिरीश आणि नम्रता या दोघांचेही अभिनय जेमतेम आहेत. गणेश यादव आणि अशोक समर्थ वगळता कोणत्याही कलाकाराने त्याच्या भूमिका ताकदीने पेललेल्या नाहीत. चित्रपटातील अनेक गोष्टी तर शेवटपर्यंत अनुत्तरीतच ठेवण्यात आल्या आहेत. अनंत जोग यांनी या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका साकारली आहे. त्यांचा मुलगा अजयला मारायचा प्रयत्न करतो. अजयचा अपघात न होता त्याला मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्याची प्रेयसी आणि रमाकांत देसाई यांना देखील वाटत असते. पण त्याचे पुढे काय होते, हे दाखवण्यात आलेले नाही. तसेच चित्रपटाची कोणतीही गाणी ओठावर रुळत नाहीत. गाणी चित्रपटात उगाचच कुठेही टाकण्यात आलेली असल्याचे जाणवते.