जान्हवी सामंतअसे अनेक हिंदी चित्रपट आहेत, ज्यामध्ये चित्रपटाची नायिका असा विचार करतेय की, प्रेमात हिम्मत दाखविणे फार महत्त्वाचे असते. पण, मुळात तिच्याकडे हिंमतच नसते. कारण ती महत्त्वाच्या क्षणीच माघार घेते. अशीच काहीशी ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाची कथा आहे. अशा हिंदी चित्रपटांमध्ये हिंमत दाखविण्याचे काम फक्त नायकाकडूनच अपेक्षित असते. मग त्याच्या स्वभावात हिंमत असो वा नसो. कारण नायिका तिच्या कुटुंबीयांनी ठरवून दिलेल्या मुलासोबत लग्न करायला कधीही तयार होते. प्रेमकथा आणि विनोदाचा संमिश्र नुमना असलेल्या ‘बहन होगी तेरी’ हा चित्रपट अशाच पठडीतील आहे. लखनऊ शहरातील एका छोट्याशा मोहल्ल्यातील गट्टू नौटीयाल (राजकुमार राव) हा बिन्नी अरोरा (श्रुती हासन) हिचा शेजारी असतो. या मोहल्ल्यात मुलींनी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या डेअरिंगबाज आशिकांना राखी बांधावी किंवा सर्वांसमोर त्यांनी प्रेमाची कबुली द्यावी ही पद्धत सामान्य असते. बिन्नी नेहमीच तिच्या बहिणीच्या पाठी लागलेल्या मुलांचा शोध घेऊन बहिणीला त्या मुलांच्या हातावर राखी बांधण्यास प्रवृत्त करीत असते. अशात गट्टूत बिन्नीवर असलेल्या प्रेमाची कबुली देण्यात हिंमत नसते. तरीसुद्धा तो तिला आणि तिच्या परिवाराला छोट्या-मोठ्या गोष्टीतून इम्प्रेस करण्यात यशस्वी होतो. टप्प्याटप्प्याने गट्टू बिन्नीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. पण त्याआधी त्याला अनेक ठिकाणी हिंमत दाखवावी लागते. काही चाचण्या द्याव्या लागतात. कधी त्याला कुठल्याही मुलीला प्रपोज करावे लागते तर कधी एखाद्या बॉडी बिल्डरची छेड काढावी लागते. बिन्नीसुद्धा आपलं आयुष्य गट्टूसोबत काढण्याचं ठरवते. परंतु, त्या दोघांच्या कुटुंबीयांची आपापसात इतकी जवळीक असते की, दोघाही परिवारांच्या सदस्यांना असेच वाटते, बिन्नी हे गट्टूची बहीणच आहे. त्यामुळे बºयाच गुंतागुंती समोर येतात. त्यातच मोहल्ल्यातील लोकांना असे वाटते की, बिन्नीला गट्टूचा मित्र भुरा आवडतो. म्हणून बिन्नीला फ्रान्सहून आलेल्या राहुलसोबत (गौतम गुलाठी) लग्न करण्यास तयार केले जाते. आता त्यांचे लग्न होणार की नाही, हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच समजेल. दरम्यान राजकुमार रावने गट्टूची भूमिका अगदीच चपखलपणे पार पाडली आहे. पण, त्याची श्रुती हासनसोबतची जोडी फारशी भावत नाही. कारण दोघांमध्ये म्हणावी तशी केमिस्ट्री जमलेली नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, संपूर्ण पटकथेत केवळ आठ मिनिटांचे विनोदी दृश्य आहेत. जे दोन तासापर्यंत ताणण्यात आले आहेत. या चित्रपटात येणाºया घटना आणि वर्ण अगदीच अवास्तव वाटतात. चित्रपटात काही ठिकाणी चांगल्या गोष्टी आहेत. गट्टू आणि भुरा यांच्यातील संवादाचे दृश्य, गट्टू आणि त्याच्या वडिलांसोबतचे (दर्शन जरीवाल) संवाद चित्रपटात थोडासा जीव घालतात. बाकी चित्रपट हा यथातथाच आहे. म्हणून तो नाही बघितला तरी चालेल.