सुवर्णा जैन
महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. पु.लं.नी अवघ्या महाराष्ट्राला हसवलं, जगणं शिकवलं, आयुष्य सुखी तसंच समृद्ध केले. पु.लं च्या साहित्याने महाराष्ट्रालाच नाही तर वाचकवर्गाला जगण्याची अनुभूती दिली. त्यांचं व्यक्तिचित्रण किती खुसखुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळतं. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो. हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भूषण होतं. पु.लं.देशपांडे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर दाखवणं, पु.लं.चं जीवन जसं होतं तसं रुपेरी पडद्यावर मांडणं तितकं सोपं नाही. मात्र हेच शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यशस्वीरित्या पेललं आहे.
लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिनेमाच्या पूर्वाधाच्या काही मिनिटांतच रसिक भाईंच्या लोभसवाणी रुपाच्या प्रेमात पडतो. सिनेमाची कथा जसजशी पुढे सरकते तसतशी सगळी पात्र म्हणजेच सगळी माणसं भेटायला येऊ लागतात. ही सगळी मंडळी भाईंच्या जीवनाशी जोडलेली तर काही साहित्यातील. पु.ल. रुपेरी पडद्यावर पाहताना रसिकांना भावते तो त्यांचा निरागसपणा. एवढा मोठा माणूस तरीही किती साधा होता ही रसिकांच्या काळजाला भिडते. त्यांचं मनमौजी असणं, स्वच्छंदी जगणं आणि कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची दृष्टी किती निरागस होती हे सिनेमा पाहताना प्रत्येक सीनमध्ये जाणवते.
सिनेमाचा प्रत्येक सीन काळजाला भिडणारा वाटता. लग्न होत असताना पत्नीला हार घालणारा या सीनपासून पत्नीच्या प्रतिमेला हार घालणारा सीन उत्कृष्ट पद्धतीने चित्रीत करण्यात आला आहे. हे पाहताना रसिक स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळतं. पुलंच्या जीवनावरील सिनेमा म्हणजे रसिकांचं खळखळून हसणं ओघानं आलंच, मात्र काही सीन पाहताना रसिक तितकाच भावुक होतो. या सिनेमाचं सगळ्यात मोठं यश म्हणजे सागर देशमुखने साकारलेले पु.ल. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाचा रसिकांना रुपेरी पडद्यावर आनंद देण्यात सागरचा सिंहाचा वाटा आहे. पु.ल. साकारण्यात कुठेही कमी पडणार नाही यासाठी सागरने घेतलेली मेहनत प्रत्येक सीनमध्ये पाहायला मिळते. यासोबतच इरावती हर्षे यांनी साकारलेल्या सुनीताबाईसुद्धा मनाला भिडतात.
महेश मांजरेकर यांनी या सिनेमातून 'भाई-व्यक्ती की वल्ली' सिनेमातून पुलंचं जीवन रुपेरी पडद्यावर दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नसल्याचं सिनेमातून पाहायला मिळतं. पुलंची साहित्यसंपदा, त्यांनी लिहिलेली नाटकं, रंगभूमीवरील प्रयोग, संगीत, गाणी, चित्रपट, त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या व्यक्तीरेखा, प्रवासवर्णनं सारं काही अडीच तासाच्या सिनेमात मांडणं कुणालाही शक्य नाही. मात्र त्यातून काही तरी पाहायचा राहिलं असं भाई-व्यक्ती की वल्ली रुपेरी पडद्यावर बघितल्यावर वाटत नाही. महेश मांजरेकर यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुक व्हायलाच हवं.
सिनेमाचं संगीतही रसिकांना भावणारं आणि प्रत्येक दृष्याला समर्पक असंच आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ‘कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं पाहायला मिळतं. मराठी साहित्य तसंच संस्कृतीचा सुवर्णयुगही सिनेमातून रसिकांना अनुभवण्याची संधी लाभली आहे. भाईंसह वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, राम गबाले आदी मंडळी रुपेरी पडद्यावर पाहणं रसिकांसाठी मेजवानीच आहे. त्यामुळे भाई-व्यक्ती की वल्ली हा सिनेमा रसिकांचं मनोरंजन करण्यात आणि भाईंचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडण्यात कुठेही कमी पडत नाही असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.