अजय परचुरे ईद आणि सलमान खानचा सिनेमा रिलीज होणे हे खूप वर्षापासूनचं एक प्रकारचं बॉलिवूडमधील घट्ट नातं आहे. ईदला सलमानचा सिनेमा येणार आणि हमखास सुपरहिट होणार ही आत्तापर्यंतची आख्यायिका होती. मात्र सलमानचा ट्यूबलाईट हा एकमेव सिनेमा ईदला रिलीज होऊनही बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला होता. त्यामुळे सलमानने यावेळी आपला भारत हा सिनेमा ईदला रिलीज करताना आपला पुराना हिट फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला आहे. अॅक्शन,ड्रामा,डान्स,गाणी, धमाल,मस्ती याचा पुरेपूर भरणा असलेला सलमान खानचाभारत सिनेमा यावेळी त्याच्या अस्सल फॅन्सच्या पचनी नक्की पडणार असं चित्र आहे. कारण भारत हा सिनेमा फॅन्सच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करू शकणारा एक अस्सल मसालापट आहे. मुळात भारत हा सिनेमा काही ओरिजनल सिनेमा नाही . दक्षिण कोरियाई सिनेमा ओड टू माय फादर या सिनेमावर भारत आधारित आहे. भारत ( सलमान खान) ह्याची कहाणी त्याचे वडील (जॅकी श्रॉफ) यांच्यासोबत फ्लॅशबॅकमधून थेट १९४७ च्या फाळणीच्या वेळेपासून सुरू होते. फाळणीच्या वेळेस भारत आपले वडिल आणि छोटया बहिणीपासून कायमचा वेगळा होता. भारतचे वडिल भारतला त्याची आई आणि लहान भावाची दिल्लीत जाऊन आयुष्यभर काळजी घे असं वेगळं होताना वचन घेतात. आणि भारत त्याची आई (सोनाली कुलकर्णी) ,एक बहिण आणि लहान भावाला घेऊन कायमचा दिल्लीत स्थायिक होतो. आपल्या दिल्लीतल्या आत्याच्या दुकानावर तो आपल्या कुटुंबियांना स्थिरस्थावर करण्यासाठी दिवसाची रात्र करत असतो. यासाठी त्याला निवार्सित झालेल्या विलायती (सुनील ग्रोव्हर) याची मोलाची साथ मिळते. आपल्या कुटुंबाचा भार उचलण्यासाठी भारत एका सर्कसमध्ये बाईक स्टंट मास्टरचं काम करतो. जिथे त्याची रोमँटिंक केमिस्ट्री राधा (दिशा पटानी) सोबत जुळते. मात्र कालांतराने अधिक पैसे कमावण्यासाठी भारत सर्कस सोडून १९६४ ला आखाती देशात तेल काढणाºया कंपनीत कामगार म्हणून रूजू होतो. इथे त्याची भेट कुमुद रैना (कटरीना कैफ) शी होते. आखाती देशात पैसा कमावून भारत परत आपल्या देशात येतो. आपल्या बहिणीचं लग्न लावतो. घराची घडी नीट बसवतो. मात्र हे सगळं करत असतानाच भारतला फाळणीत दुरावा निर्माण झालेल्या आपल्या वडिलांची आणि लहान बहिणीची आठवण येत असतेच. त्याला विश्वास असतो की कधी ना कधी त्याची बहिण आणि त्याचे वडिल त्याला पुन्हा एकदा भेटतील. यासाठी भारत पुन्हा जंग जंग पछाडतो. यात भारतला यश मिळतं का ? भारत आपलं दिल्लीतील दुकान वाचवतो का ? हे तुम्हांला सिनेमा पाहिल्यावरच कळेल.
सिनेमा हा पूर्णपणे मसालापट आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने हा सिनेमा बांधताना कुठेही या सिनेमाला कंटाळवाणं स्वरूप दिलं नाहीये हे विशेष. सिनेमाचा पूर्ण जीव सलमान जरी असला तरी अलीने इतर कलाकारांच्या भूमिकांनाही तितकाच न्याय दिला आहे. शूटींगसाठी निवडण्यात आलेली लोकेशन्स, सिनेमाचं चित्रीकरण, या सिनेमातील गाणी, विनोद , आकर्षक संवाद याचं संपूर्ण मिश्रण अली अब्बास जफरने अगदी योग्य ठिकाणी पेरलं आहे.
भारत सिनेमात जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी फक्त सलमान आणि सलमानच आहे. सलमान खानने आपल्या नेहमीच्या अंदाजानुसार १९४७ पासून ते आत्तापर्यंतच्या स्थित्यंतरांना आपल्या अनोख्या अंदाजातील अभिनयशैलीने जिवंत केले आहे. आर्कषक संवाद, गाणी,डान्स, अॅक्शन हा मसाला असला की सलमान खान अजून खुलतो हे भारतने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कतरिना कैफने सलमानला पुरेपर साथ दिली आहे. जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, दिशा पटानी यांनी आपल्या छोट्याश्या भूमिकेतही जीव ओतून काम केलं आहे. सलमानच्या मित्राच्या भूमिकेत सुनिल ग्रोव्हरने धमाल उडवलीय. आत्तापर्यंत आपल्याला फक्त विनोदी भूमिकांमुळे माहित असलेला सुनिल ग्रोव्हर एक परिपूर्ण अभिनेता आहे हे भारत या सिनेमामुळे सिद्ध होणार आहे.
त्यामुळे ईदच्या मुहर्तावर सुट्टीत एक धमाल मसालेपट तुम्हांला एकदा पाहायचा असल्यास भारतचा पर्याय अतिशय योग्य आहे. भारतमधून समाज प्रबोधनात्मक विचार जरी काही मिळणार नसला तरी तीन घटका रिलॅक्स फ्री धमाल मनोरंजन अनुभवण्यासाठी भारत पाहण्यासारखा नक्कीच आहे.