Bhool Bhulaiyya 3: हॉरर कॉमेडी असलेला 'भूल भुलैय्या ३' सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. विद्या बालनला पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर होते. ट्विस्टने भरपूर, मंजुलिका-अंज्युलिकाची जुगलबंदी, रूहबाबाच्या कॉमेडीने हसवणारा 'भूल भुलैय्या ३'चा रिव्ह्यू एकदा वाचा.
कथानक : एका राजघराण्यातील खुर्चीच्या संघर्षासाठी लढणाऱ्या भावा बहिणीची ही कथा आहे. सिनेमाची सुरुवात अशी होते की नृत्य करणाऱ्या व्यक्तीला राजा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो. त्यानंतर २०० वर्षांनंतर कथा पुढे सरकते. राजमहलमधील एका खोलीत मंजुलिकाची आत्मा कैद करून ठेवल्यामुळे राजघराण्यातील व्यक्तींवर महल सोडण्याची वेळ येते. राजघराण्याचे आताचे वंशज हा राजमहल विकण्याचा निर्णय घेतात. आणि तिथेच एन्ट्री होते रुहबाबा साकारणाऱ्या कार्तिक आर्यनची. 'भूल भुलैय्या ३'मध्ये केवळ मंजुलिकाच नाही तर तिची बहीण आँज्युलिकाही आहे. त्यामुळे 'भूल भुलैय्या ३'मध्ये त्रिपल डोस मिळतो.
लेखन आणि दिग्दर्शन : हॉरर कॉमेडी असल्यामुळे सिनेमाचा मध्यंतरापूर्वीचा भाग थोडासा कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, सिनेमात खरी मजा मध्यंतरानंतर आहे. सिनेमाची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. सिनेमात ट्विस्टवर ट्विस्ट येत असल्याने आपण लावलेले सगळेच अंदाज फोल ठरतात. हे ट्विस्ट योगरित्या प्लॉट करण्यात आणि ते योग्य प्रकारे मांडण्यात लेखक आणि दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. पण, सिनेमात हॉरर कॉमेडीचा भूल भुलैय्या झाल्याचं दिसतं. 'भूल भुलैय्या २'च्या तुलनेत 'भूल भुलैय्या ३' कथा आणि इतर बाकी गोष्टींमध्येही वरचढ आहे. पण, 'भूल भुलैय्या'ला मात्र तोड नाही.
अभिनय: 'भूल भुलैय्या ३' सिनेमाची स्टारकास्ट चपखल बसली आहे. कार्तिक आर्यनने त्याची व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. सिनेमात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन असल्याने अभिनय, नृत्य अशा सर्वच गोष्टींचा डबल डोस मिळतो. पण, प्रेक्षकांना अपेक्षा असल्याप्रमाणे विद्या बालनची मंजुलिका दिसत नाही. राजपाल यादव, संजय मिश्रा, अश्विनी कळसेकर यांना मात्र फार जागा सिनेमात मिळाली नसल्याची खंत वाटते. तृप्ती डिमरीचा सुमार अभिनय पडद्यावर नकोसा वाटतो.
सकारात्मक बाजू : व्हिएफएक्स, कथा, दिग्दर्शन नकारात्मक बाजू : हॉरर कॉमेडी सिनेमात कॉमेडी आणि भयपट दोन्हीचा अभावथोडक्यात काय तर माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि खिळवून ठेवणाऱ्या कथेसाठी 'भूल भुलैय्या ३' एकदा तरी पाहायला हवा.