-जान्हवी सामंतबॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या एका दुर्धर आजाराशी लढा देतोय. विदेशात त्याच्यावर उपचार सुरु असताना आज शुक्रवारी त्याचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट रिलीज झाला. अभिनय देव दिग्दर्शित हा कॉमेडी थ्रीलर चित्रपट कसा आहे, जाणून घेण्यासाठी वाचा..................................................‘कहने को तो यह शहर है, मगर इधर जंगल का कानून चलता है...चिटी को बिस्तुरिया खा जाता है, बिस्तुरिया को मेंडक़..मेंडक को साप निगल जात है...नेवला साप को मारता है...’, ‘अग्निपथ’ या चित्रपटातील हा संवाद तुफान गाजला होता. इरफान खानचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपटही अमिताभ बच्चनच्या या संवादासारखाच आहे. ‘ये दुनिया बडी गोल है...’ असेच काहीसे ‘ब्लॅकमेल’चे कथानक आहे. कोण कुणाचा फायदा घेतोय आणि कोण कुणाशी प्रतारणा करतोय, हे कळायला बराच वेळ लागतो. पण एक अतिशय गुंतागुंतीची गोष्ट अगदी सरळपणे सांगण्याचा एक अप्रतिम प्रयत्न, असेच या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल.देव कौशल (इरफान खान) या मध्यवर्ती पात्राभोवती या चित्रपटाचे अख्खे कथानक फिरते. देव हा एका टिशू पेपर कंपनीत मार्केटींगचे काम करणारा एक साधा-सरळ पुरूष असतो. कामाला कंटाळलेला, दर महिन्याला भराव्या लागणाºया ईएमआयला थकलेला आणि आयुष्यातील तोच तोचपणाला वैतागलेला देव एकदा मित्राच्या सांगण्यावरून पत्नी रिनाला (किर्ती कुल्हारी) सरप्राईज द्यायला निघतो. हातात पुष्पगुच्छ घेऊन तो लवकर घरी पोहोचतो. पण घरी पोहोचल्यावर पत्नीचे बाहेर कुणासोबत तरी अफेअर असल्याचे त्याला त्यादिवशी कळते. प्रचंड संताप येऊनही त्याक्षणी तो गप्प राहतो. खूप विचार केल्यावर तो पत्नीचा बॉयफ्रेन्ड रणजीतला (अरूणोदय सिंह) ब्लॅकमेल करायचे ठरवतो. रणजीतही पत्नी डॉली (दिव्या दत्ता) आणि तिच्या राजकीय क्षेत्रातील वजनदार वडिलांना ही गोष्ट कळू नये म्हणून इरफानच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडतो. पण डॉली आणि तिच्या वडिलांकडून पैसे घेतले असल्याने रणजीतलाही पैशांची गरज असते. ही गरज भागवण्यासाठी तो खोट्या नावाने देवची पत्नी रिनालाचं ब्लॅकमेल करायला लागतो. ब्लॅकमेलरला पैसे देण्यासाठी रिना फिरून देवला पैसे मागते आणि देव रणजीतला. या गुंतागुंतीत देवचा मित्र आनंद याला देव पत्नीच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत असल्याचे कळते आणि मग तो सुद्धा एका मैत्रिणीच्या मदतीने देवला ब्लॅकमेल करायला लागतो. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून रिना रणजीतला प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडून ब्लॅकमेलरची माहिती काढण्याचे सुचवते. मध्यंतरापर्यंत हाच सगळा गोंधळ बघायला मिळतो. पण मध्यंतरानंतर देव, रिना आणि रणजीत या त्रिकोणांत आणखी अनेक बिंदू येऊन मिळतात. या शहरात सगळेच स्वार्थी, लबाड आणि एकमेकांकडून फायदा उकळणारे आहेत. याला देव किंवा रिनाही अपवाद नाहीत, हेच या कथेवरून जाणवतं.वेगवेळी पात्र आणि त्यांचे कथानक तपशीलवार दाखवले गेल्याने चित्रपट पाहताना मोठा वाटतो. पण संपूर्ण चित्रपटात इरफान भाव खावून जातो. एकीकडे साधेपणा आणि दुसरीकडे तेवढाच कपटीपणा त्याने अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलायं. अरूणोदय सिंह, दिव्या दत्ता, किर्ती कुल्हारी आणि उर्वरित कलाकारांनीही इरफानच्या तोडीस तोड काम केले आहे. चित्रपटात व्यभिचार दाखवला असला तरी दिग्दर्शक कुठल्याही प्रकारची नैतिक भूमिका घेत नाहीत. व्यभिचार किंवा प्रतारणा अनेक प्रकारे होऊ शकते. पण हे दाखवताना दिग्दर्शकाने प्रेम, विश्वास यावर भाष्य करणे टाळले आहे. याआधीच्या आपल्या ‘देल्ही बेरी’ या चित्रपटासारखीच ‘डार्क कॉमेडी’ आणि उपहासात्मक ढंगात अभिनय देव यांनी ही गोष्ट मनोरंजक आणि विनोदी पद्धतीने सांगितली आहे. या विनोदी कथेत निश्चितपणे काही त्रूटीही आहेत. पण तरिही एकदा तरी जरूर पाहावा, असाच हा चित्रपट आहे.