दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा (Sandeep Reddy Vanga) बहुप्रतिक्षित Animal सिनेमा प्रदर्शित झालाय. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) हिंसक अवतार, बॉबी देओलचा (bobby Deol) दमदार लूक आणि वडील-मुलाच्या नातेसंबंधावर असलेली कहाणी असा एकंदर हा सिनेमा असेल हे ट्रेलरमधून स्पष्ट झालं होतं. तब्बल पावणे दोन तासांनंतर मध्यंतर होते इतका मोठा हा सिनेमा आहे. मात्र तुम्हाला पूर्णवेळ खिळवून ठेवण्यात सिनेमा यशस्वी ठरेल. नक्की कसा आहे Animal वाचा रिव्ह्यू
कथानक :
सिनेमाची कथा बाप-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. फ्लॅशबॅकपासून सिनेमाला सुरुवात होते. पहिल्या भाग पूर्ण भावनिकरित्या गुंतवून टाकणारा आहे. यामध्ये अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. वडिलांच्या प्रेमासाठी मुलगा मनातल्या मनात कुढत असतो. वडील मात्र मुलाकडे खूप दुर्लक्ष करतात. नंतर जेव्हा वडिलांवर हल्ला होतो तेव्हा मुलगा त्या माणसाला शोधून त्याला मारणं हेच मुलाचं ध्येय बनतं. कथा कितीही सोपी वाटत असली तरी यामध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात. विशेष म्हणजे वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या मुलाचं नाव पहिल्या भागाच्या शेवटपर्यंत रिव्हील केलं जात नाही. अॅक्शनने परिपूर्ण या सिनेमात रक्तपात, इमोशन्स असा एकंदर मिर्चमसाला आहे. बॉबी देओलसाठी सिनेमा बघायला जाणाऱ्यांना मात्र थोडी निराशा होऊ शकते. कारण बॉबीला कमी स्क्रीनटाईम देण्यात आला आहे. त्याची एन्ट्री थेट दुसऱ्या भागात होते मात्र जेव्हा तो स्क्रीनवर येतो तेव्हा त्याने आग लावली आहे.
सिनेमाच्या शेवटी क्लायमॅक्स सीनही आहे तो चुकवू नका. यामध्ये दिग्दर्शकाने सिक्वेलची हिंट दिली आहे.
अभिनय :
रणबीर कपूरचे गेले काही चित्रपट फ्लॉप झाले. या सिनेमातून मात्र त्याने पुन्हा आपलं टॅलेंट सिद्ध केलं आहे. त्याची भूमिका पाहून हे नक्कीच सोपं नाही याची जाणीव होते. इमोशनल, रोमँटिक किंवा अॅक्शन असा कोणताही सीन असो रणबीर तुम्हाला प्रभावित करतो. लव्हर बॉयची इमेज सोडून तो दमदार अॅक्शन भूमिका साकारत भल्याभल्यांना टक्कर देत आहे. बॉबी देओलने मिळालेल्या प्रत्येक सीनमध्ये जीव ओतला आहे. त्याच्या फिटनेसने तर आधीच त्याने प्रेक्षकांना चकित केलं आहे. त्याचं कामही जबरदस्त झालं आहे. रश्मिकाची भूमिकाही फिल्ममध्ये सरप्राईजिंग आहे. तिने भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. अनिल कपूरनेही नेहमीप्रमाणेच मन जिंकलं आहे.
दिग्दर्शन :
संदीप रेड्डी वांगाने पुन्हा एकदा या सिनेमातून आपलं वैशिष्ट्य दाखवून दिलंय. प्रेक्षकांना कंटाळा येऊ न देता प्रत्येक सीनमध्ये त्यांना खिळवून ठेवणं याची कला दिग्दर्शकाला जमली आहे. शिवाय सिनेमाचं म्यूझिक रसिकांसाठी विशेष आकर्षण आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, अॅक्शन, संगीत
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, खूप जास्त रक्तपात, हिंसाचार
थोडक्यात सिनेमा मास एंटरटेनर आहे. रणबीरच्या अभिनयासाठी हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.