भारताला पॅराआॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा खराखुरा नायक महाराष्ट्रातील सांगलीमधील गावात राहात असल्याचे हा चित्रपट येण्यापूर्वी फार कमी लोकांना माहित असेल. जगाच्या नकाशावर भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरल्यानंतर अंधारात हरवलेल्या मुरलीकांत पेटकररूपी नायकाला प्रकाशझोतात आणत त्यांच्या कार्याला सलाम करण्याचं काम या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक कबीर खानने केलं आहे.
कथानक - १९५२ मध्ये भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून परतल्यावर कराडमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते. ती पाहण्यासाठी जगन्नाथ पेटकर धाकटा भाऊ मुरलीकांतला घेऊन कराडला जातो. मिरवणूकीचा सोहळ्या पाहिल्यावर लहानगा मुरलीकांतही आॅलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवण्याचा निश्चय करतो. शाळेपासून गावापर्यंत त्याला 'चंदू चॅम्पियन' म्हणून हिणवलं जातं. कुस्ती शिकण्यासाठी तो गणपत पैलवानच्या तालिमीत जातो. पैलवान त्याला काही शिकवत नाही, पण दारा सिंगना गुरू मानून आणि कुस्ती बघून मुरलीकांत डावपेच शिकतो. मुरलीकांतला काही येत नसल्याचं मानून गणपत पैलवान त्याला हरण्यासाठी आपल्या भाच्याच्या विरोधात मैदानात उतरवतो, पण मुरलीकांत त्याला धोबीपछाड देतो. ते प्रकरण जीवावर बेतल्याने मुरलीकांत फक्त लंगेटवर गावातून पळ काढतो. त्यानंतर मुरलीकांतचा गोल्ड मेडल पटकावण्यासाठी संघर्ष सुरू होतो.
लेखन-दिग्दर्शन - कधीही हार न मानणाऱ्या नायकाची ही जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. मुरलीकांत यांनी पावलोपावली केलेला संघर्ष यात आहे. गावाच्या विकासासाठी अर्जुन पुरस्कार मागणाऱ्या मुरलीकांत यांची कहाणी २०१७मध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यावर २०१९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतरही मुरलीकांत पेटकर भारतातील सोडा, पण महाराष्ट्रातीलही फार कोणाला माहित नव्हते. या चित्रपटाने ते नाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवलं आहे. कोणत्याही मराठी दिग्दर्शकाने जे काम केलं नाही ते कबीर खानसारख्या हिंदीतील आघाडीच्या दिग्दर्शकाने करून दाखवत मुरलीकांत यांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. यात त्यांच्या वैवाहिक जीवनाचा फारसा उल्लेख नाही. युद्धातील दृश्ये फारशी प्रभावी नाहीत. 'तू है चॅम्पियन...', 'सरफिरा...', 'सत्यानास...' हि गाणी चांगली आहेत.
अभिनय - कार्तिक कार्यनचा आजवरच्या कारकिर्दीमधील हा सर्वात सुंदर परफॅार्मन्स आहे. यासाठी त्याने घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना जाणवते. विजयराजने पुन्हा एकदा प्रशिक्षकाची भूमिका मोठ्या जबाबदारीने साकारली आहे. श्रेयस तळपदेने पोलिस इन्स्पेक्टर छान रंगवला आहे. राजपाल यादवचं कॅरेक्टरही एका टप्प्यावर महत्त्वाचं ठरलं आहे. सोनाली कुलकर्णीचा गेस्ट अपिरियन्सही कथानकाला कलाटणी देणारा आहे. हेमांगी कवीने एका छोट्याशा दृश्यात ओतलेला जीव कौतुकास पात्र ठरणारा आहे. गणेश यादवने साकारलेला गणपत पैलवान दमदार वाटतो. भुवन अरोरा आणि यशपाल शर्मा यांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, वातावरणनिर्मितीनकारात्मक बाजू : वैवाहिक जीवनातील संदर्भांचा अभाव, युद्धभूमीवरील दृश्येथोडक्यात काय तर महाराष्ट्रात जन्मलेल्या या नायकाची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासपूर्ण संघर्षाची कहाणी अत्यंत प्रेरणादायी असल्याने एकदा अवश्य पाहायला हवी.