गेल्या कित्येक दिवसांपासून सगळेच ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'छावा' सिनेमा अखेर सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...का पाहावा छावा? एकदा हा रिव्ह्यू वाचा.
कथानक : सिनेमाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमी पासून होते. या बातमीने खूश झालेल्या औरंगजेबाच्या चेहऱ्यावर उमटलेली हास्याची लकेर पुसायला येतो शिवरायांचा छावा. सिनेमात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ते औरंगजेबाच्या कैदेत असेपर्यंतचा काळ दाखविण्यात आला आहे. एवढा मोठा कालखंड आणि खूप पटापट घडणाऱ्या घटना दाखविण्यात दिग्दर्शकाची दमछाक झाली आहे. त्यामुळे काही घटनांचे संदर्भ लावणं कठीण जातं. मध्यापर्यंत सिनेमा हळू हळू पुढे जातो पण त्यानंतर मात्र सिनेमा भरर्कन झेप घेत असल्याचं जाणवतं. संभाजी महाराजांच्या काळात हा सिनेमा तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. सिनेमातील संवाद आणि काही सीन हे निश्चितच अंगावर काटा आणणारे आहेत. तर साहजिकच आपसुकच तुमच्या डोळ्यांत पाणी येते. सिनेमाची जमेची बाजू म्हणजे फार थोड्या ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली आहे. सिनेमा अतिरंजित करण्यासाठी कुठलाही भडिमार केल्याचं जाणवत नाही.
अभिनय : छावामध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली आहे. या भूमिकेसाठी त्याने खऱ्या अर्थाने प्राण ओतले आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षेस विकी खरा उतरला आहेच पण त्याबरोबरच त्याने मनातील संभाजी महाराज पडद्यावर उभे केल आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने विकी कौशलने संभाजी महाराज साकारले आहेत. त्यास तोडीस तोड असा औरंगजेब अक्षय खन्नाने उभा केला आहे. या सिनेमानंतर औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना मनावर कोरला जाण्याची शक्यता आहे. इतकी भूमिका त्याने उत्तम वठवली आहे. येसूबाईंच्या भूमिकेत असलेल्या रश्मिकानेही भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्या नात्याचा वेगळा पदर सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळतो. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. सगळ्यांनीच त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण, संतोष जुवेकर मर्द मराठा मावळा म्हणून छाप पाडतो.
मोठा ट्विस्ट: छावा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व हे वेगळ्या प्रकारे दाखविण्यात आलं आहे. पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमात असा प्रयोग करण्यात आला आहे. पण त्यामुळे संभाजी महाराजांच्या कथेवरुन अजिबात फोकस हलल्याचं जाणवत नाही. उलट यामुळे संभाजी महाराजांची दुसरी बाजू दाखविण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.
नकारात्मक : सिनेमाचं कथानक मोठं असल्याने काही घटनांचे संदर्भ लागत नाहीत आणि मध्यांतरानंतर सिनेमा पटकन पुढे जातो.
सकारात्मक बाजू : संभाजी महाराजांवर पहिल्यांदाच एवढा भव्यपट बनवला गेला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही थिएटरमधून एक विलक्षण अनुभव आणि डोळ्यात पाणी घेऊनच बाहेर पडाल. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघा.